Dishan Gandhi : दिशान गांधीची कॉर्फ बॉल स्पर्धेत सातासमुद्रापार भरारी

कॉर्फ बॉल या खेळाबाबत नगरमध्ये विशेष सुविधा नसतानाही, येथील दिशान गांधी याने आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे.
Dishan Gandhi
Dishan GandhiSakal
Summary

कॉर्फ बॉल या खेळाबाबत नगरमध्ये विशेष सुविधा नसतानाही, येथील दिशान गांधी याने आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे.

अहमदनगर - कॉर्फ बॉल या खेळाबाबत नगरमध्ये विशेष सुविधा नसतानाही, येथील दिशान गांधी याने आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. त्याची विश्‍वकरंडक जिंकण्यासाठी तयारी सुरू आहे. या खेळात नगरचे इतर खेळाडू घडविण्याचे स्वप्न तो पाहत आहे. अवघ्या २१ व्या वर्षी त्याने मिळविलेले यश नगरची मान उंचावणारे ठरले आहे.

दिशान येथील पेमराज सारडा महाविद्यालयात एम. कॉम.च्या प्रथम वर्षात शिकत आहे. त्याला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. फिरोदिया हायस्कूलमध्ये असताना तो क्रिकेट खेळायचा. एवढेच नव्हे, तर कर्णधारही तोच असायचा. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने सारडा महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे तो बास्केटबॉल खेळात रमला. २०१९ मध्ये बास्केटबॉलमध्ये सारडा महाविद्यालयाच्या संघाने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज संघाला हरविले. त्या संघामध्ये दिशान होता.

याच दरम्यान प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. हा मुलगा कॉर्फ बॉल खेळात चांगले करिअर करू शकतो, हे त्यांनी हेरले. चांगले प्रशिक्षण दिले. २०१९ मध्ये गडचिरोली येथे झालेल्या स्पर्धेत दिशानने कांस्यपदक पटकाविले. त्यानंतर बारामती येथे सुवर्णपदक मिळविले.

२०२१ मध्ये कुलू-मनाली व २०२२ मध्ये सोलन (हिमाचल प्रदेश) येथे कांस्यपदक मिळविले. यादरम्यान नेदरलँडमधील प्रशिक्षक ॲटेव्हनस्ट्रॅग यांचे मार्गदर्शन लाभले. जालंधर (पंजाब) येथे शिबिर झाले. तेथेच भारताचा संघ तयार झाला. दिशान त्यामध्ये वयाने सर्वांत लहान होता. रोहतक (हरियाना), तसेच थायलंडमध्ये अंतिम सामने होऊन आंतरराष्ट्रीय पातळीसाठी हे खेळाडू तयार झाले. भारताने कॉर्फ बॉलमध्ये तब्बल ११ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संघ पाठविला.

आशिया- ओशिनिया चॅम्पियनशिप स्पर्धा झाल्या. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना झाला. त्यानंतर जपान, थायलंड, इंडोनेशिया या देशांविरुद्ध सामने होऊन भारताचा संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. ऑक्टोबरमध्ये तैवानमध्ये हे सामने खेळविले जाणार आहेत. या सर्व खेळांत दिशान गांधीने विशेष कर्तृत्व सिद्ध केले.

दिशानचे वडील किशोर गांधी हे जाहिरात क्षेत्रात आहेत. आपल्या यशात वडील व आई बबिता गांधी यांचे पाठबळ असल्याचे दिशान आवर्जून सांगतो. प्रा. धोपावकर यांच्याबरोबरच कॉर्फ बॉल असोसिएशनचे महाराष्ट्राचे सचिव डॉ. गौतम जाधव (बारामती), श्री. मानवत, देव बलारा (हरियाना), नीतेश लटवाल (भारताचे कर्णधार) यांचे दिशानला मार्गदर्शन लाभले. आगामी काळात उच्चशिक्षणाबरोबरच मुंबई, पुणे व नगर येथे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार असून, नगरच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा दिशानचा मानस आहे.

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडेही लक्ष द्यावे. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता येते. प्रत्येकाने क्षेत्र कोणतेही निवडावे; मात्र एखाद्या तरी खेळात करिअर करायला हवे. कोणताच खेळ हलका किंवा भारी नसतो, तर आपली आवड व योग्य प्रशिक्षणामुळे आपणाला त्यामध्ये वेगळी ओळख निर्माण करता येते.

- दिशान गांधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com