esakal | रस्त्यासाठी विखे-लोखंडेंमध्ये श्रेयवादाची लढाई

बोलून बातमी शोधा

सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे
रस्त्यासाठी विखे-लोखंडेंमध्ये श्रेयवादाची लढाई
sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिर्डी ः सावळीविहीर ते नगर या अंतरातील राज्यमार्गाचे रूपांतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गात केले. 496 कोटी रुपये खर्चाचे हे काम पुढील महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. मात्र, हे काम सुरू करताना त्यांनी नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना त्याबाबतची पत्रे धाडली. त्यामुळे या पत्रांच्या माध्यमातून श्रेयवादाची लढाई लढण्यात दोन्ही खासदारांना चांगलेच बळ मिळाले.

आधी रस्त्याचे काम आपल्या पाठपुराव्यामुळे सुरू होत असल्याची घोषणा नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. त्यापाठोपाठ खासदार सदाशिव लोखंडे यांनीही या पत्राच्या आधारे हे काम आपल्या पाठपुराव्यामुळे सुरू होत असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात गडकरी यांनी या दोन्ही खासदारांना केवळ माहितीस्तव ही पत्रे धाडली आहेत.

यातील सावळीविहीर ते कोल्हार या अंतरातील रस्ता लोखंडे यांच्या मतदारसंघातून, तर कोल्हार ते नगर बाह्यवळण रस्त्यापर्यंतचा भाग डॉ. विखे पाटील यांच्या मतदारसंघातून जातो. मात्र हे दोघेही या संपूर्ण रस्त्याचे काम आमच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याचा दावा एकाचवेळी करीत आहेत.

गंमतीचा भाग असा की गडकरी यांनी अशाच आशयाची पत्रे आमदारांना देखील धाडली आहेत. हा रस्ता आमदार राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री प्राजक्त तनपुरे व नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या विधानसभा मतदारसंघांतून जातो. मनात आणले तर या मंडळींनादेखील त्यांना आलेल्या पत्राच्या माध्यमातून श्रेय घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

खरे कोपरगाव ते कोल्हार या अंतरात दहा कोटी रुपये खर्च करून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. त्यास तातडीने निधी व वेग देणे गरजेचे आहे. त्याकडे या मंडळींनी लक्ष दिले व अधिकाऱ्यांपुढील अडचणी दूर केल्या, तर फार बरे होईल, अशी सामान्य प्रवाशांची अपेक्षा आहे.

दीड वर्षात काम पूर्ण होणार

सावळीविहीर ते नगर या अंतरातील रस्त्याच्या कामाची किंमत 496 कोटी रुपये असली, तरी ठेकेदार कंपनीने 430 कोटी रुपये किमतीचे टेंडर भरले. बॅंक हमी घेऊन पुढील महिन्या अखेर या कंपनीला कार्यारंभ आदेश दिले जातील. पुढील दीड वर्षात हे काम पूर्ण होईल. कोल्हार येथील प्रवरा नदीवरील जुना पूल पाडून नवा पूल उभारला जाईल. 31 किलोमीटर लांबीच्या अंतरात कॉंक्रिटीकरण, तर उर्वरित डांबरीकरण केले जाईल. यात निमगाव ते पिंपरी निर्मळ बाह्यवळण रस्त्याचा समावेश नाही, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी "सकाळ' शी बोलताना दिली.

बातमीदार - सतीश वैजापूरकर