नगरमध्ये कामगार संघटनेच्या भुमिकेमुळे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांतच असंतोष 

अमीत आवारी
Monday, 27 July 2020

अहमदनगर महापालिकेतील कर्मचारी कोरोनाच्या विषाणूमुळे बाधित होत आहेत. मात्र त्यांना महापालिका अधिकाऱ्यांकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही.

नगर : अहमदनगर महापालिकेतील कर्मचारी कोरोनाच्या विषाणूमुळे बाधित होत आहेत. मात्र त्यांना महापालिका अधिकाऱ्यांकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. महापालिका अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामाविरोधात महापालिका कामगार संघटना घेत असलेली भुमिका बोटचेपीपणाची असल्याचा आरोप आता महापालिका कर्मचाऱ्यांतूनच होऊ लागला आहे.

कामगार संघटनेतील पदाधिकारीच आता संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व काही पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक बैठक घेऊन नाराजी व्यक्‍त केली. 

गेल्या आठवड्यात महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने कामगारांनी कामबंद आंदोलन केले होते. महापालिका अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणीचे आश्‍वासन दिले. या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवत कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे महापालिका कर्मचारी कामावर हजर झाले. मात्र त्यांची आरोग्य तपासणीच होत नसल्याने पुन्हा कामगार संघटनेला कामबंद आंदोलन करावे लागले.

कामबंद आंदोलन होताच महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासण्या केल्या. ही घटना घडून आठवडा होत नाही तोच महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. महापालिकेजवळ दोन रुग्णवाहिका असूनही या महिलेला नेण्यासाठी एकही रुग्णवाहिका आली नाही. महापालिकेतील अधिकाऱ्यांकडूनही या महिलेला कोणतीही मदत मिळाली नाही. तिच्या नातेवाईकांनी तिला छोट्या टॅम्पोत बसवत महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये नेले.

मात्र तेथेही तिला जागा देण्यात आली नाही. शहरातील खासगी कोविड सेंटरमध्येही जागा न मिळाल्याने सुमारे सहा तास या महिलेला तिच्या नातेवाईकांनी शहरातील विविध रस्त्यांवरून रुग्णालयात जागा शोधत फिरविले. अखेर आमदार संग्राम जगताप व नगरसेवक कुमार वाकळे यांच्या सहकार्यामुळे या महिला कामगाराला जिल्हा रुग्णालयात जागा मिळाली. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 
घटना समजताच अहमदनगर महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी महापालिका आयुक्‍तांची भेट घेऊन त्यांना कोरोना बाधित कामगार महापालिका कार्यालयात नेऊन ठेवण्याचा इशारा दिला. त्यानुसार आयुक्‍तांनी या कर्मचाऱ्याला बुथ हॉस्पिटलमध्ये जागा करून देण्याचे आश्‍वासन दिले.

मात्र या प्रकारामुळे महापालिका कर्मचाऱ्यांत असंतोष वाढीस लागला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाढत आहे. या अधिकाऱ्यांना संघटना पाठीशी तर घालत नाही ना असा सवाल महापालिका कर्मचारी व संघटनेतील पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी त्या महिला कर्मचाऱ्याला बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मात्र तेथे अतिदक्षता विभाग नसल्याने पुन्हा या कर्मचाऱ्याला संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व उपाध्यक्ष अय्युब शेख यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महापालिका कार्मचारी संघटनेचे अध्यक्ष कामगारांसाठी लढत असले तरी महापालिका अधिकाऱ्यांबाबत बोटचेपीची भुमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. 

अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने कधीही बोटचेपीपणाची भुमिका घेतलेली नाही. कामगाराला उपचारा अभावी सहा तास शहरात फिरावे लागले. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली अशी विचारणा करण्यासाठी आज सकाळी आम्ही महापालिका आयुक्‍तांकडे गेलो होतो. मात्र शहरात कोविड कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रातील पथक आले असल्याने आयुक्‍त या पथकासमवेत गेले होते. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. 
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, अहमदनगर महापालिका कामगार संघटना 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dissatisfaction among office bearers and employees due to the role of trade union in the Nagar