अकोले तालुक्यात पोलिस प्रशासनाबाबत नाराजी; पोलिस अधिक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष्य

शांताराम काळे
Friday, 20 November 2020

अकोले तालुक्यात पोलिस प्रशासनाच्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. नुकतीच एक क्लिप व्हायरल झाली.

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात पोलिस प्रशासनाच्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. नुकतीच एक क्लिप व्हायरल झाली असून एका चोरीच्या प्रकरणात तीन पोलिस निलंबित झाले आहेत. मात्र जिल्हा पोलिस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याबाबत तालुक्याचे लक्ष्य लागले आहे. 

अकोले तालुका हा डाव्या चळवळीचा असून अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात येथे नेहमीच आंदोलने झाली आहेत. अकोले येथील पोलिस स्टेशनच्या हद्दीत लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यात वाढ झाली. अवैद्य वाहतूक, वाळू तस्करी, अवैद्य दारू, गोमास वाहतूक होऊनही या केसेस आर्थिक तडजोड करून मिटविण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत आवाज उठविले गेले मात्र काही काळात ते थांबले देखील. क्लिप व्हायरल प्रकरणात काही आर्थिक तडजोड झाल्याची पारावर चर्चा रंगू लागल्या आहेत. 
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिलेल्या टेम्पोची चौकशी न होताच टेम्पोच सोडून देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होऊन वरिष्ठ अधिकारी याना याबाबत निवेदनही पाठवून हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. 

वाळू तस्करी अधिक जोमाने फोफावू लागली असून त्याला पायबंद घालण्याऐवजी पोलिस व वाळू तस्कर तुझ्या गळा माझ्या गळा भूमिकेतून काम करीत आहे. 
कुंपणानेच शेत खाल्ले अशी घटना टायर चोरी प्रकरणात घडली नि त्यातूनच क्लिपचे रहस्य बाहेर आले. याबाबत आवाज राजकीय दबावामुळे दाबला कि काय अशी शंका व्यक्त होत आहे. ही क्लिप जुनी असल्याचा अधिकारी दावा करत असले तरी वस्तुस्थिती असेल तर टायर चोरी प्रकरणात तीन पोलिस कर्मचारी निलंबित होत असतील तर यातही कारवाई होणे आवश्यक असल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे. 

यापूर्वीही अनेक प्रकरणात तडजोडी झाल्या मात्र 'तेरी बी चूप व मेरी बी चूप म्हणत कुणी पुढे आले नाही . तर आपली तक्रार अकोले पोलिसांनी घेतली नाही. म्हणून मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त यांचेकडे पत्रकार राजेंद्र आंब्रे यांनी तक्रार करून पत्रकार सुरक्षा अधिनियम कलमान्वये अकोले पोलिस इन्स्पेकटर अरविंद जोंधळे यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे अकोले पोलिस स्टेशन सध्या वादात सापडले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dissatisfaction with police administration in Akole taluka