उगाच नाही म्हणत, सरकारी काम अन सहा महिने थांब

दौलत झावरे
Tuesday, 6 October 2020

ग्रामपंचायत विभागाला औषधखरेदीची माहिती व औषधाबाबत जास्त माहिती नसल्यामुळे त्यांच्यापुढेही अडचणी निर्माण झाल्या. त्यातून औषधखरेदीची सावळा गोंधळ सुरू आहे.

नगर ः राज्यातील जनतेला "अर्सेनिक अल्बम 30' औषधवाटपाच्या सूचना आयुष मंत्रालयाने दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयाने सर्व जिल्हा परिषदांना "अर्सेनिक अल्बम 30' औषध वाटपाचा आदेश दिला.

गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात अर्सेनिक औषधवाटपाचे जिल्हा परिषदा नियोजन करीत आहेत. मात्र, "सरकारी काम अन्‌ बारा महिने थांब..' या म्हणीचा अनुभव येत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. त्यामुळे या औषधांचे वाटप करण्याच्या सूचना आयुष मंत्रालयाने दिल्या. त्यानुसार, राज्य सरकारने जिल्हा परिषदांना औषधवाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यातील कुटुंबसंख्या, लोकसंख्येची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेने औषधखरेदी करण्याचा आदेश निघाला; परंतु ही खरेदी कशी करावी, याबाबत स्पष्ट निर्देश दिले नाहीत. 

ग्रामपंचायत विभागाला औषधखरेदीची माहिती व औषधाबाबत जास्त माहिती नसल्यामुळे त्यांच्यापुढेही अडचणी निर्माण झाल्या. त्यातून औषधखरेदीची सावळा गोंधळ सुरू आहे. राज्यातील 34 पैकी ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांतच औषधवाटप झाले आहे. उर्वरित जिल्ह्यांत फक्त नियोजनच सुरू आहे.

काही ठिकाणी निविदाप्रक्रिया सुरू आहे; मात्र त्यातही अडचणी येत आहेत. राज्य सरकारने ग्रामपंचायतींना दिलेल्या तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगातील निधीच्या व्याजातून औषधखरेदीचे नियोजन केले आहे. हे पैसे जमा करून घेतले आहेत. मात्र, प्रत्यक्षात औषधखरेदी झालेली नाही. 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांना तातडीने अर्सेनिक अल्बम औषधांचे वाटप होणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात कुठलीच कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे औषधवाटपाचा नुसता "फार्स' आहे का, असा सवाल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमधून उपस्थित होत आहे. औषधखरेदीची परवानगीही ग्रामपंचायतींना दिली असती, आतापर्यंत वाटप झाले असते, अशी प्रतिक्रिया एका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने दिली. 

आरोग्य विभागाकडे जबाबदारी द्या 
अर्सेनिक अल्बम 30 औषधखरेदीची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविल्यास, सर्व खबरदारी घेऊन ते नियोजन करू शकतील. ग्रामपंचायत विभागाने खरेदी केल्यास औषधाची मात्रा, त्याचा दर्जा तपासणी अशक्‍य होणार असल्याचे मत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यातील साडेसात लाख कुटुंबीयांना अर्सेनिक अल्बम 30 औषधवाटपाचे नियोजन केले असून, खरेदीची प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यानंतर तातडीने त्याचे वाटप करण्यात येणार आहे. 
- निखिलकुमार ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of arsenic pills stalled