
'पिकेल ते विकेल' या माध्यमातून जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप व माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केल्याचे पाहायला मिळाले.
अकोले (नगर) : 'पिकेल ते विकेल' या माध्यमातून जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप व माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केल्याचे पाहायला मिळाले. इंडोनेशिया निळा भाताची तालुक्यातील आदिवासी भागात दहा शेतकऱ्यांनी लागवड केली असून हे भात कमरेइतके वर आले आहे. ते पाहण्यासाठी कृषी विभागाने शिवार फेरी काढून प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बांधावरच बसून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना सांगितल्या.
मा.आ.वैभव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप व तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी इंडोनेशिया येथील निळा भात वाणाबद्दल मार्गदर्शन केले व शिबीर घेतले. त्यासोबतच स्वर्गीय जितेंद्र भाऊ पिचड सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या तसेच कोविड योध्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी अकोले पंचायत समितीचे उपसभापती दत्ता देशमुख, राजूर सरपंच मा. गणपतराव देशमुख, उपसरपंच मा.गोकुळ कानकाटे, स्व.जितेंद्रभाऊ पिचड सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शम्भू नेहे, अंबित गावचे शेतकरी सरपंच, ग्रामसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धामणवंन येथील शेतकरी शांताराम बारामते यांनी तीन गुंठ्यात एक किलो बियाणे टाकून हा असामी निळा भात लावला. त्याचे उत्पादन किमान तीन क्विंटल इतके होईल असे शेतकऱ्याने सांगितले. तर गंगाराम धिंदळे यांनीही काळभात पेक्षा अधिक उत्पादन व उत्पन्न होणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले.
यावेळी अधीक्षक शिवाजी जगताप म्हणाले, प्रयोगिक तत्वावर इंडोनिशियाचा निळा, जांभळा भात आसाममध्ये व आपल्याकडे रावसाहेब बेंद्रे कृषी अधिकारी हे आसाममध्ये सल्लगार असल्याने त्यांनी हा भात आपल्याकडे पाठविला. त्याचे हेक्टरी २८ क्विंटल उत्पादन होते. त्याची खात्री झाली, त्यामुळे हे भात लागवड करण्यात आली. आपल्याकडील भाताचे उत्पादन १,३२४ किलो हेकटर आहे. त्याची उत्पदकता चांगली आहे. त्यात ऍन्थो सायलिंगपिगमेंट असून न्यूट्रेशन व्हॅल्यू अधिक आहे. त्यामुळे आजारी माणसाची प्रतिकार शक्ती अधिक वाढते.
हा भात व्याधिग्रस्त ग्राहक अधिक घेतात. हा भात ३०० ते ४०० रुपये किलोने विकला जातो. पुढील वर्षी रत्नगिरी आठ हा भात लागवड करण्यात येईल. या भागात परंपरागतसेंद्रिय कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय गट रजिष्टर झाला असून आदिवासी शेतकऱ्यांच्या या प्रमाणित झालेल्या सेंद्रिय शेतीत पिके घेऊन त्याचे ब्रॅंडिंग करून साई ऑरगॅनिकच्या माध्यमातून पिकेल ते विकेल या संकल्पनेतून उत्पादक ते ग्राहक योजना राबवून आदिवासी शेतकऱ्याच्या खिशात पैसे देऊ असेही ते म्हणाले.
शेती वाणाचे संवर्धन करताना आधुनिकतेची कास धरून काळ भात, असामी भात, फॅन्स, काजू प्रक्रिया उद्योग उभारून आदिवासी शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांच्या उत्पदनाबरोबर स्पर्धा करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ भात व निळ्या भाताची उल्लेखनीय कामाबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक केले असून पिकेल ते विकेल याचे अनुकरण करून शेती करा, असे आव्हान केले.
यावेळी सकाळ ऍग्रोवन मध्ये सरपंच सयाजी अस्वले यांचा कुमशेत गावाचा लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल त्यांचा वैभव पिचड व कृषी अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गंगाराम धिंदळे यांनी आभार मानले.
संपादन - सुस्मिता वडतिले