
जुलै-2019मध्ये तलाठी भरतीप्रक्रिया राबविली. मात्र, त्यात निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती आदेश मिळाले नव्हते.
पारनेर (अहमदनगर) : जिल्ह्यात जुलै-2019मध्ये तलाठी भरतीप्रक्रिया राबविली. मात्र, त्यात निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती आदेश मिळाले नव्हते. याबाबत आमदार नीलेश लंके यांनी जूनमध्ये मुख्य सचिवांकडे या उमेदवारांना नियुक्त्या देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार, राज्याचे उपसचिव डॉ. संतोष भोगले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संशयित उमेदवारांची यादी राखून ठेवत, इतर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचा आदेश दिला.
डॉ. भोसले यांनी 2 डिसेंबर रोजीच जिल्हाधिकाऱ्यांना हा आदेश पाठविला आहे. त्यानुसार, 84 पैकी पात्र उमेदवारांना नियुक्त्या मिळणार आहेत. जिल्ह्यातील तलाठ्याच्या 84 पदांसाठी जुलै-2019मध्ये प्रवेशपरीक्षा झाली. त्यातून डिसेंबर-2019मध्ये पात्र उमेदवारांची यादीही प्रसिद्ध झाली. मात्र, नंतर ही भरतीप्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली. त्यामुळे तिची चौकशी सुरू झाली. मात्र, त्यात अनेक पात्र उमेदवारांच्याही नेमणुका रखडल्या. ही बाब त्यांनी लंके यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्याची दखल घेत, लंके यांनी पात्र उमेदवारांना तातडीने नेमणुका देण्याची मागणी केली. त्यांच्या पत्राची दखल घेत, डॉ. भोसले यांनी ही भरतीप्रक्रिया तातडीने राबविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
संपादन : अशोक मुरुमकर