
दिवाळीत उभारलेल्या विविध साहित्य विक्री स्टॉलचे किराया (भाडे) नगरपालिकेच्या फंड खात्यात अद्याप जमा झालेला नसल्याचा प्रकार उघडकीस आला.
श्रीरामपूर (अहमदनगर) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मेनरोड परिसरात उभारलेल्या विविध साहित्य विक्री स्टॉलचे किराया (भाडे) नगरपालिकेच्या फंड खात्यात अद्याप जमा झालेला नसल्याचा प्रकार उघडकीस आला.
निमित्त होते नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे. सभेत नगराध्यक्षा अनुराधा अदिक, प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या उपस्थित सदस्य नगरसेवक आणि पालिका कर्मचारी यांची विविध विषयावर चर्चा झाली.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहरातील डेली-मार्केटच्या ठेक्याबाबत चर्चा सुरु असताना दिवाळीच्या बाजारपेठेसाठी मेनरोड परिसरात उभारलेल्या स्टाॅलचा सवाल नगरसेविका भारती कांबळे यांनी उपस्थित केला असता सदर प्रकार समोर आला. दिवाळीच्या काळात मेनरोड परिसरात एकुण 70 लहान-मोठे स्टाॅल किरायाने (भाडेतत्वावर) उभारले असून त्यांच्याकडुन पालिका प्रशासनाला केवळ साडे चौदा हजार रुपयांचे किराया (भाडे) वसूल झाल्याची माहिती संबधीत विभागाने दिली.
सदर रक्कम पालिकेच्या खात्यात केव्हा जमा झाल्याची विचारणा नगरसेविका कांबळे यांच्यासह किरण लुणिया, श्रीनिवास बिहाणी, राजेश अलग, मुझफर शेख, राजेंद्र पवार, रवी पाटील केली. त्यामुळे पालिकेच्या संबधीत विभागाच्या कर्मचारी वर्गाची मोठी कोंडी झाली. सदर रक्कम अद्याप अतिक्रण विभागाच्या कर्मचारी यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले. त्यावर नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत कडक कारवाईची मागणी लावुन धरली. असे प्रकार टाळण्यासाठी अधिकारी वर्गावर लोकप्रतिनिधींचा वचक असणे आवश्यक असल्याचा एकसुर नगसेवकांमधुन निघाला.
पालिकेच्या फंडात जमा असलेल्या रक्कमेची विचारणा करण्यात आली. तसेच पालिकेला कुठल्या विभागातुन पैसे येणे बाकी असल्याची विचारणा करीत संबधीत कर्मचारी वर्गाची नगरसेविका कांबळे यांनी कोंडी केली. पालिकेचे पैसे स्वतःकडे ठेवल्याने संबधीत कर्मचार्यांवर कारवाई करुन व्याजाची रक्कम वसुल करण्याची मागणी मुख्याधिकारी डोईफोडे यांच्याकडे करण्यात आली. सण-उत्सवात उभारलेल्या स्टाॅलच्या किराया (भाडे) वसूली करणारया अधिकार्यांना समज पाठविण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
सण-उत्सव काळात मेनरोड परिसरात थाटलेल्या बाजारपेठेतील स्टाॅलचा ठेका स्वतंत्रपणे देण्याची मागणी नगरसेवक मुक्तार शहा यांनी केली. यंदाच्या दिवाळीच्या बाजारपेठेतील स्टाॅलचा किराया (भाडे) पालिकेला अवघे साडे चौदा हजार रुपये मिळाले. तर दिवाळीच्या बाजापेठेतील स्टाॅलच्या साफसफाई आणि इतर नियोजनासाठी दिड लाख रुपये खर्च आल्याने पालिकेला तोटा सहन करावा लागल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर