शिक्षकांची दिवाळी वेतनाविना, जिल्हा परिषदेविरोधात संताप

सनी सोनावळे
Friday, 13 November 2020

दीपावलीसाठी शासनाने सर्वच कर्मचाऱ्यांना 12 हजार रुपये सण अग्रीम मंजूर केला आहे; परंतु तोही दीपावली संपल्यानंतरच शिक्षकांच्या खात्यावर जमा होईल.

टाकळी ढोकेश्वर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या, वेळेवर वेतन करण्याबाबतच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन सातत्याने विलंबाने होत आहे. ऐन दिवाळीत शिक्षक वेतनापासून वंचित राहिल्याचे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी सांगितले. 

प्रसिद्धिपत्रकात ठुबे यांनी म्हटले आहे, की शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षकांचे वेतन दीपावलीपूर्वी देऊ शकलेला नाही.

दीपावलीसाठी शासनाने सर्वच कर्मचाऱ्यांना 12 हजार रुपये सण अग्रीम मंजूर केला आहे; परंतु तोही दीपावली संपल्यानंतरच शिक्षकांच्या खात्यावर जमा होईल. शिक्षक परिषदेने वेळोवेळी जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्यासाठी सातत्याने जिल्हा परिषद प्रशासनाला विनंती केली.

शिक्षकांच्या वेतनीसंबंधात सुधारणा न झाल्यास शिक्षक परिषदेस आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. शिर्डीत होणाऱ्या शिक्षक परिषदेच्या राज्यव्यापी विभागीय बैठकीत संस्थापक आमदार संजय केळकर यांचे लक्ष वेधणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, राजेंद्र जायभाय, श्रीकृष्ण खेडकर, उच्चाधिकार समिती अध्यक्ष आर. पी. राहाणे, महिला आघाडी अध्यक्ष मीनाक्षी तांबे, सरचिटणीस दत्तात्रेय गमे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali without teachers' salary anger against Zilla Parishad