नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये हजारो कोरोना रूग्ण कशामुळे बरे झालेत माहितीय का?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

आयुर्वेदिक औषधांचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. रुग्णांमधील ताप, कोरडा खोकला, सर्दी, घसा दुखणे, थंडी वाजून येणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, अतिशय थकवा वाटणे, जुलाब होणे, वास न येणे, चव न कळणे, भूक न लागणे, नैराश्‍य, प्रचंड भीतीमुळे झोप न लागणे, ही लक्षणे औषधे सुरू केल्यावर कमी होऊ लागल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले.

नगर ः कोरोनाबाधित रुग्णांना उत्तम दर्जाची, प्रत्येकी 15 दिवसांची औषधे मोफत दिली जातात. संघटनांचे डॉक्‍टर व समाजातील दानशूर व्यक्ती हा सर्व औषधांचा खर्च करीत आहेत. आयुर्वेदिक डॉक्‍टरांना मानधन दिले जात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात राबविलेला हा महाराष्ट्रातला पहिलाच उपक्रम ठरला आहे.

हेही वाचा - चहाचा शेवटचा घोट घेत असतानाच

आयुर्वेदिक औषधांचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. रुग्णांमधील ताप, कोरडा खोकला, सर्दी, घसा दुखणे, थंडी वाजून येणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, अतिशय थकवा वाटणे, जुलाब होणे, वास न येणे, चव न कळणे, भूक न लागणे, नैराश्‍य, प्रचंड भीतीमुळे झोप न लागणे, ही लक्षणे आयुर्वेदिक औषधे सुरू केल्यावर कमी होऊ लागल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले. 

आयुर्वेद व्यासपीठ, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन व प्रभा आयुर्वेद फाउंडेशन या आयुर्वेद पदवीधारकांच्या संघटनांतर्फे येथील बूथ हॉस्पिटलमधील "कोरोना'बाधित रुग्णांवर 18 जूनपासून आयुर्वेदिक औषधोपचार सुरू करण्यात आले. त्यामुळे तब्बल 1400 रुग्ण ठणठणीत झाले. गेले 74 दिवस अखंड ही सेवा सुरू आहे. 

रुग्णांची 15 दिवसांनी व एक महिन्याने दूरध्वनीद्वारे विचारपूस केली असता, नंतरही काहीच त्रास झाला नसल्याचे रुग्णांनी सांगितले. औषधांसह रुग्णांचे नियमितपणे तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्‍टरांकडून समुपदेशन केले जाते. त्यांचे मनोबल टिकविण्यासाठी, त्यांच्या विचारांत सकारात्मकता आणण्यासाठी उत्तम वाचन, ध्यान, योगासने, योग्य व्यायामाची माहिती दिली जाते. कोरोनासारख्या महामारीला सक्षमपणे सामोरे जायचे असेल, तर आयुर्वेद आपण जीवनशैली म्हणून स्वीकारायला हवे, असे आवाहन करण्यात आले. 

या सामाजिक उपक्रमात डॉ. महेश मुळे, डॉ. मंदार भणगे, डॉ. अंशू मुळे, डॉ. रंजना मुनोत, डॉ. आनंद नांदेडकर, डॉ. शौनक मिरीकर, डॉ. ज्योती चोपडे, डॉ. महेंद्र शिंदे, डॉ. विलास जाधव, डॉ. मंगेश काळे, डॉ. श्रुती माळी, डॉ. राहुल काजवे, डॉ. धनश्री धर्म, डॉ. मैत्रेयी लिमये व डॉ. विश्वनाथ काळे आदी तन-मन-धनाने सहभागी झाले आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know why so many patients have been cured in Booth Hospital, Ahmednagar?