पीएम किसनमध्ये डॉक्टर, वकील सरकारचे निवृत्त अधिकारी?

मार्तंड बुचुडे 
Wednesday, 21 October 2020

पारनेर तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये सुमारे दोन हजार 367 करदाते व 219 अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन सरकारची कोट्यावधी रूपयांची फसवणुक केला आहे.

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये सुमारे दोन हजार 367 करदाते व 219 अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन सरकारची कोट्यावधी रूपयांची फसवणुक केला आहे.

आता या अपात्र शेतकऱ्याकडून सुमारे दोन कोटी 26 लाख 14 हजार वसुल करण्याचे आदेश सरकारी पातळीवरून प्रातांधिकारी व तहसीलदार यांना आले आहेत. त्यामुळे वसुलीसह ज्या शेतक-यांनी सरकारची फसवणुक करून लाभ घेतला त्यांचेही धाबे दनाणले आहेत.

सुमारे दोन वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली. त्यासाठी सरकारने हा लाभ शेतकऱ्यांना सरसकट न देता अनेक अटी घातल्या होत्या. या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी प्रती वर्षी सहा हजार रूपयांचा लाभ देण्यात येतो. ही रक्कम तीन टप्यात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. यासाठी सरकारने मोठा गवगवा करूनही योजना जाहीर केली तसेच त्यासाठी सेतू केंद्र व खाजगी स्वरूपातही पीएम किसान पोर्टलवर या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना अर्ज दाखल करता येत आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी हा करदाता नसावा तसेच नोकरदारांना 10 हजार रूपयांपेक्षा अधिक निवृत्ती वेतन नसावे, तसेच आजी माजी मंत्री आमदार, खासदार, राज्यसभा सदस्य, जिल्हा परीषद सदस्य, सरकारचे निवृत्त अधिकारी, डॉक्टर, वकील यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र तरी सुद्धा अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ही फक्त प्राथमिक यादी आहे. अधिक तालुक्यात या योजनेच्या लाभार्थींची सखोल चौकशी केली तर अजूनही अनेक अपात्र लाभार्थी सापडणार आहे.

या योजनेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारे संबधीत अधिकाऱ्यांनी दक्षता न घेतल्याने या योजनेत कोट्यावधी रूपयांचा गैरव्यहवार झाला आहे. या योजनेत गरजू व अनेक गरीब शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ मिळाला नाही. फक्त हुशार व चलाख अशा अनेक बोगस लाभार्थींना मात्र याचा लाभ घेतला आहे. आता वसुलीचे आदेश आल्यानंतर मात्र बोगस लाभार्थींचे पितळ उघडे पडले आहे. आता या वसुलीचे मोठे अव्हान तहसीलदार व संबधीत यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. 

तालुक्यात अशाच प्रकारे संजय गांधी निराधार योजनेतही तालुक्यातील हजारो अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. याही योजणेत खरे गरीब व गरजू मात्र वंचित आहेत. मात्र अनेक बोगस व ज्यांच्या घरात मुले नोकरदार आहेत. शेती ही भरपूर आहे, अशा लोकांनी मात्र या योजनेचा लाभ घेतला आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor advocate took advantage of PM Kisan Yojana