भयंकरच! पत्नीसह दोन मुलांना विषारी इंजेक्शनाने मारून डॉक्टरने घेतला गळफास

दत्ता उकिरडे
Saturday, 20 February 2021

डॉक्टरांच्या आत्महत्येने कर्जत तालुक्यासह वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले आहे.

राशीन ः कर्जत तालुक्यातील राशीन येथे आज सकाळी खळबळजनक घटना घडली आहे. एका डॉक्टरने पत्नी व मुलांसह आत्महत्या केली आहे. या प्रकाराने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

डॉ. महेंद्र थोरात असे या डॉक्टरांचे नाव आहे. पत्नी वर्षा, थोरला मुलगा कृष्णा आणि धाकटा कैवल्य अशी त्यांची नावे आहेत. ते गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जात. सकाळी पेशंट त्यांच्या घरी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सामाजिक कामात अग्रेसर असलेला माणूस नेमके असे कसे काय करू शकतो, याची चर्चा सुरू झाली आहे. पत्नी व दोन मुलांना इंजेक्शन देऊन नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली असावी, अशी परिसरात चर्चा आहे. पोलिस या घटनेबाबत सखोल तपास करीत आहेत.

हेही वाचा - दोन कलावंतांची अवेळी एक्झिट

डॉक्टरांच्या दवाखान्यात एखादा पेशंट आला नि त्याच्याकडे पैसे नसले तर ते स्वतः मेडीसीन घेण्यासाठी पैसे द्यायचे, इतकी त्यांची रूग्णांबाबत तळमळ असायची. इतका सह्रदय माणूस असा कसा करू शकतो, याने राशीनसह कर्जत परिसराला घेरले आहे.

डॉक्टरांनी असे का केले....

डॉ. थोरात हे कोमल ह्रदयाचे ग्रहस्थ होते. त्यांच्या थोरल्या मुलाला ऐकायला कमी येत होते. त्याला समाजाकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळायची, यामुळे ते दाम्पत्य व्यथित होते. तो मुलगा अकरावीला आहे. पत्नीच्या मदतीने जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुसाईडनोटमध्ये आढळून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor commits suicide by injecting children with his wife