
नगर शहरातील दोन नाट्य कलावंतांचे बुधवारी (ता. 17) अकाली निधन झाले. त्यामुळे नाट्यवंतांत शोकाकूल वातावरण आहे. अजय मधुकर खडामकर (वय 52) व सुनील ज्ञानेश्वर तरटे (वय 44) अशी त्यांची नावे आहेत.
अहमदनगर : नगर शहरातील दोन नाट्य कलावंतांचे बुधवारी (ता. 17) अकाली निधन झाले. त्यामुळे नाट्यवंतांत शोकाकूल वातावरण आहे. अजय मधुकर खडामकर (वय 52) व सुनील ज्ञानेश्वर तरटे (वय 44) अशी त्यांची नावे आहेत.
अजय खडामकर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अभिनेता व उत्कृष्ट प्रकाश योजनाकार म्हणून 25 वर्ष कार्यरत होते. लंडनची सून इंडियात हनिमून या व्यावसायिक नाटकाच्या 300 पेक्षाही अधिक प्रयोगांत त्यांनी भूमिका केली होती. डी.वाय.पाटील विद्यापीठ येथे त्यांनी आर्टिस्ट म्हणून नोकरी केली. उत्तम चित्रकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व आई असा परिवार आहे.
सुनील तरटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते हौशी रंगभूमीवर अभिनेता व तंत्रज्ञ होते. सप्तरंग नाट्य संस्थेच्या माध्यमातून गेली 20 वर्ष ते कार्यरत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संस्थेचे क्रियाशील सभासद, काही लघुपट, मालिका व चित्रपटात यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
दोन्ही कलावंतांचा अंत्यविधी नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत झाला. यावेळी चित्रपट निर्माते अभिनेते बलभीम पठारे, संजय घुगे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले, सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष श्याम शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी. कुलकर्णी, रंगकर्मी प्रतिष्ठान अध्यक्ष रितेश साळुंके, अभिनेता क्षितिज झावरे, प्रसाद बेडेकर, वैभव कुऱ्हाडे, प्रशांत जठार, आबा सैंदाने आदी उपस्थित होते