esakal | कोरोना लसीकरणाबाबत डॉक्टरांनाच माहिती नाही

बोलून बातमी शोधा

Doctors do not know about corona vaccination}

लसीकरण झालेल्यांची संख्या कमी आणि दमछाक झालेल्यांची संख्या अधिक, असे चित्र पहिल्या दिवशी पाहायला मिळाले.

कोरोना लसीकरणाबाबत डॉक्टरांनाच माहिती नाही
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राहाता ः येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरच कोरोना लसीकरण मोहिमेबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. 

थेट केंद्रावर कागदपत्रे सादर करून लसीकरणाची सुविधा असतानाही, येथील डॉक्‍टरांना त्याबाबत काहीही सांगता येत नव्हते. व्याधी प्रमाणपत्राचे निकष कुणालाही ठाऊक नव्हते. त्यामुळे काहींना गरज नसलेले प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागले.

लसीकरण झालेल्यांची संख्या कमी आणि दमछाक झालेल्यांची संख्या अधिक, असे चित्र पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. किमान उद्या (बुधवारी) तरी हा गोंधळ दूर व्हावा, अशी अपेक्षा ज्येष्ठांनी व्यक्त केली. 

ग्रामीण रुग्णालयात काल दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते. ऑनलाइन नोंदणीसाठी ज्येष्ठांसह व्याधिग्रस्तांची दमछाक सुरू होती. विशेष म्हणजे, लसीकरणासाठी वय वर्षे 60 असावे की 65, याबाबत कोणालाच माहिती नव्हती. 60 वर्षे वयाच्या नागरिकांनीही व्याधिग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र आणावे, असे बिनदिक्कत सांगण्यात आले. त्यामुळे केंद्रातून हात हलवत परत जाण्याची वेळ ज्येष्ठांवर आली.

काहींनी धावपळ करून डॉक्‍टरांकडून ही प्रमाणपत्रे मिळविली. घाईने पुन्हा ही मंडळी ग्रामीण रुग्णालयात आली. मात्र, तोपर्यंत अधिकारी व डॉक्‍टरांचा गैरसमज दूर झाला होता. त्यांनी दुपारनंतर 60 वर्षांवरील नागरिकांना, व्याधी असल्याची प्रमाणपत्रे न घेता, लस द्यायला एकदाची सुरवात केली. 

हेही वाचा - षटकाराच्या बादशहाची अपघाताने घेतली विकेट

एकीकडे वृत्तवाहिन्यांवरून ऑनलाइन नोंदणीत अडचणी आल्यास थेट केंद्रावर कागदपत्रे दाखवून लसीकरण केले जाईल, अशी माहिती दिली जात होती. मात्र, येथील अधिकारी, डॉक्‍टरांपर्यंत ही माहिती पोचलीच नव्हती. वरिष्ठांनी त्यांना पुरेशी माहिती न दिल्याने त्यांनाही काय सांगावे, हे सुचत नव्हते. 
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के म्हणाले, की संकेतस्थळ बंद पडत असल्याने ऑनलाइन नोंदणीत अडचणी येत होत्या. तथापि, तरीही बऱ्याच नागरिकांनी नोंदणी केली. या गोंधळाबाबत माहिती घेऊ. 

दरम्यान, कोविड रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार तालुक्‍यात कालपर्यंत 107 रुग्ण उपचार घेत होते. त्यात सर्वाधिक संख्या शिर्डी 34 व राहाता 33 येथील आहे. तालुक्‍यातील 54 पैकी 31 गावांत एकही रुग्ण नाही. उर्वरित 22 गावांत केवळ एक आकडी रुग्णसंख्या आहे. 

राहात्यात बाधितांची संख्या 3509 
तालुक्‍यातील बाधितांची संख्या 3509 झाली असून, त्यातील 3342 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे. सरकारी यंत्रणेकडे तालुक्‍यात आजवर 60 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.