सिद्धटेक मंदिरात कुत्री देते आशीर्वाद, व्हिडिओ होतोय व्हायरल! भाविकांनी केले देवत्त्व बहाल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

गेल्या काही दिवसांपासून ही कुत्री केंद्रस्थानी आली आहे. सध्या मंदिरे खुली झाल्याने देवालयात गर्दी वाढते आहे. हे ठिकाण भीमानदी काठी पुणे आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर आहे.

अहमदनगर ः देवाच्या दारात काय होईल हे सांगता येत नाही. मनुष्यच काय कोणताही जीव राऊळात आला की त्याला देवपण येतं, असं मानलं जातं. पंढरीहून वारी करून गेलेल्या माणसाचे दर्शन घेण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.

सध्या सोशल मीडियात एका कुत्रीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ही कुत्री अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धटेक (ता. कर्जत, जि.अ.नगर) मंदिरात विराजमान आहे. या कुत्रीच्या रूपात लोक देव पाहू लागलेत. त्याला कारणही तसंच आहे. ही कुत्री मंदिरात येणाऱ्यांना आशीर्वाद देते.

काही भाविक या कुत्रीसोबत उभे राहून सेल्फीही काढून सोशल मीडियात टाकत आहेत. त्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडियात हा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे. सिद्धीविनायकाच्या मंदिरात बाहेरच्या बाजूला ही कुत्री बसलेली असते. मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर प्रत्येक भाविकाला ती स्पर्श करते. जे भाविक हात देतात त्यांच्या हातात हात देत ती अभिवादन करते. तर काही भाविक तिच्यापुढे नतमस्तक होतात. त्यांना ती पायाने आशीर्वादही देते.

गेल्या काही दिवसांपासून ही कुत्री केंद्रस्थानी आली आहे. सध्या मंदिरे खुली झाल्याने देवालयात गर्दी वाढते आहे. हे ठिकाण भीमानदी काठी पुणे आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. हे धार्मिक, पर्यटन स्थळ असल्याने येथे नेहमी सहली येतात. दशक्रिया विधीसाठीही लोकांची गर्दी असते.

या कुत्रीबाबत काहींना अंधश्रद्धा वाटते. त्यामुळे या घटनेला फार महत्त्व देण्याची गरज नाही. परंतु आपले धर्मशास्त्र सांगते की प्रत्येक चराचरात देव पाहिले पाहिजे, त्यानुसार या कुत्रीत देव पाहिला तर बिघडले कुठे...असाही मतप्रवाह आहे. ते काहीही असो सोशल मीडियामुळे या कुत्रीला भाविकांनी देवत्त्व बहाल केले आहे. त्यासोबतच सेल्फीमुळे ती सेलिब्रेटी बनल्याचेही जाणवत आहे. 

स्थानिक काय म्हणतात...

ही कुत्री मंदिरात गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून आहे. तिला माणसांचा लळा आहे. ती मंदिरातच असते. भाविकांशी ती प्रेमाने वागते. त्यांच्या हातात हातही देते. काहीजण तिच्यापुढे डोके वाकवतात, त्यावर ती पाय ठेवते. भाविक समजतात हा आशीर्वाद आहे. कोणीतरी तो व्हिडिओ सोशल मीडियात टाकला. त्यामुळे आता येथे येणारा प्रत्येक भाविक या कुत्रीचा भक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया सचिन गुरव यांनी दिली.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dogs bless Siddhatek temple, video goes viral