मला मारून टाकतील हो, असा मेसेज आला नि आज सकाळी मृत्यूची बातमी

विलास कुलकर्णी
Wednesday, 23 December 2020

पत्रकारांशी बोलतांना मृत अश्विनीचे वडील अरुण दादासाहेब मिजगुले (रा. कोल्हार) म्हणाले, "अश्विनीचा विवाह कोरोना लॉकडाऊन काळात 18 एप्रिल 2020 रोजी कोल्हार येथे रितीरिवाजानुसार करुन दिला. सुरुवातीचे दोन महिने व्यवस्थित गेले.

राहुरी : चिंचविहिरे येथे आज (बुधवारी) पहाटे नवविवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. सात महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला होता. अश्विनी गौतम नरोडे (वय 20, रा. चिंचविहिरे) असे मृताचे नाव आहे. 

आज सकाळी मृत अश्विनीच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. "मुलीला ठार मारून, शेततळ्यात टाकले." असा आरोप त्यांनी सासरच्या मंडळींवर केला. "अंत्यविधी झाल्यावर फिर्याद द्यायला या. गुन्हा दाखल केला जाईल." असा सल्ला पोलिसांनी त्यांना दिला.

पत्रकारांशी बोलतांना मृत अश्विनीचे वडील अरुण दादासाहेब मिजगुले (रा. कोल्हार) म्हणाले, "अश्विनीचा विवाह कोरोना लॉकडाऊन काळात 18 एप्रिल 2020 रोजी कोल्हार येथे रितीरिवाजानुसार करुन दिला. सुरुवातीचे दोन महिने व्यवस्थित गेले. नंतर सासरच्या मंडळींनी अश्विनीला त्रास देण्यास सुरवात केली. मुलीने वेळोवेळी माहेरच्या लोकांना सांगितले. परंतु, सर्वांनी तिला समजावून सांगितले. पण त्याचा उपयोग झाला नाही. आज बुधवारी (ता. 23) पहाटे साडेचार वाजता अश्विनीने मोबाईलवर मेसेज पाठवला. मला सासरचे सर्वजण मारहाण करीत आहेत. मला मारून टाकतील. असे तिने कळविले. काही वेळाने मुलीचे सासरे विजय शंकर नरोडे यांनी अश्विनीने आत्महत्या केली. असे फोनवरुन कळविले. 

हेही वाचा - रोहित पवारांच्या मातोश्री का झाल्या जामखेडकरांवर नाराज

अश्विनीचे चुलते माधव दादासाहेब मिजगुले म्हणाले, "काल मंगळवारी (ता. 22) रात्री अकरा वाजता मला फोन करून, सासरचे लोक शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे अश्विनीने सांगितले. तिची समजूत काढून सकाळी येतो. असे सांगितले. परंतु सकाळी अश्विनीच्या मृत्यूची माहिती समजली. अश्विनीचा पती गौतम विजय नरोडे, सासरा विजय शंकर नरोडे, सासू सोनाली विजय नरोडे व सावत्र सासू प्रतिभा विजय नरोडे यांनी अश्विनीला मारहाण करून जीवे ठार मारले. नंतर तिचा मृतदेह शेततळ्यात टाकला आहे." 

या प्रकरणी सध्या राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dowry victim's complaint in Rahuri