
अहिल्यानगर : साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अटकेत असलेले महानगरपालिकेचे तत्कालिन आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे व लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शेट्टी यांनी आज १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपहार केलेल्या रकमेची काय विल्हेवाट लावली, तसेच आणखी काही अपहार केला आहे का? याचा तपास करायचा आहे, त्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी तपासी अधिकारी तथा कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे व सरकारी वकील अमित यादव यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.