संगमनेर : बदलत्या हवामानात जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे संवर्धन गरजेचे

आनंद गायकवाड 
Wednesday, 9 December 2020

जास्त पावसाच्या परिस्थितीत हा सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटून पाण्यासोबत वाहून जातो. यामुळे सुपिकतेचे मोठे नुकसान होते.

संगमनेर (अहमदनगर) : बदलत्या हवामानामुळे जमिनीमधील सेंद्रीय कर्बाचा ऱ्हास होत असून, मातीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी कर्बाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मृदाशास्त्रज्ञ डॉ. डी. एस. कंकाळ यांनी केले. संगमनेर महाविद्यालयात जागतिक मृदादिनानिमित्त आयोजित केलेल्या वातावरण बदलानुसार मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावरील ऑनलाईन वेबिनारमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. यावेळी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. एस. मोरे, समन्वयक डॉ. जयश्री कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा : नगर-दौंड महामार्गावर अपघातात चौघे वर्गमित्र ठार, लोणीव्यंकनाथ शिवारात झाला अपघात

ते म्हणाले, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, आवश्यक अन्नद्रव्ये, जमिनीतील जिवाणू व ओलाव्याचे प्रमाण व जमिनीचा सामु आदी बाबींच्या योग्य प्रमाणावर मातीची सुपीकता अवलंबून असते. हवामानाच्या जास्त आणि कमी अशा पावसाच्या दोन्ही बाबींचा जमिनीच्या आरोग्यावर निरनिराळा प्रभाव असतो. कमी पाऊस आणि आवर्षण यामुळे सेंद्रीय कर्बाचे विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो.

हे ही वाचा : पारनेर तालुका दूध संघातील 51 लाखांची चोरी झाकण्यासाठी संघाच्या माजी अध्यक्षांची न्यायालयात धाव : दादासाहेब पठारे

जास्त पावसाच्या परिस्थितीत हा सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटून पाण्यासोबत वाहून जातो. यामुळे सुपिकतेचे मोठे नुकसान होते. अवर्षण आणि तापमानाचा आणखी गंभीर परिणाम जमिनीतील क्षारांच्या प्रमाणावर होतो. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना जास्त महत्वाच्या ठरतात. पिके आणि पिकपध्दती, उतारास आडवी पेरणे, जास्तीचे पाणी निघून जाण्यासाठी केलेल्या उपाययोजना, शेताची बांधबंदिस्ती, आच्छादनाचा वापर, जमीन झाकून टाकणारी पिके, धूप प्रतिबंधक पिके यासारख्या व्यवस्थापनाचा फायदा होतो. यावेळी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी सहभागी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. 

प्रास्ताविक प्रा. आशुतोष वर्पे यांनी केले. आयोजन व सूत्रसंचालन डॉ. जयश्री कडु यांनी केले. प्रा. पुनम गुंजाळ पुनम यांनी स्वागत केले तर आभार प्रा.आश्विनी तांबे यांनी मानले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. D. S. kankal said that in the changing climate conservation of soil organic carbon is needed