हॅलिकॉप्टरमुळे माझं तिकिट कापलं पण ते बरंच झालं, डॉ. सुजय विखेंचा गौप्यस्फोट

दत्ता इंगळे
Tuesday, 27 October 2020

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, सरसकट कर्जमाफी करा, या घोषणांचा विसर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पडला का, असा सवाल पाचपुते यांनी केला. कर्डिले म्हणाले की, अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली. महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली.

नगर तालुका : साकळाई योजनेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच कोटींचा निधी दिला होता. आता या योजनेच्या कामासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घ्यावा, अन्यथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने निधी दिला. आता हे सरकार केंद्राकडून जीएसटीचे पैसे मागत आहे. आम्ही जीएसटीचे पैसे आणून देण्यासाठी मदत करतो. ते पैसे शेतकऱ्यांना देणार का, असा सवाल डॉ. विखे पाटील यांनी केला. 
जिल्हा सहकारी बॅंकेतर्फे वाळकी, वडगाव तांदळी येथील शेतकऱ्यांना कर्जाच्या धनादेशाचे वाटप डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सुरेश सुंबे, सरपंच स्वाती बोठे, दिलीप भालसिंग, भाऊसाहेब बोठे, शरद बोठे, संतोष भापकर आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, सरसकट कर्जमाफी करा, या घोषणांचा विसर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पडला का, असा सवाल पाचपुते यांनी केला. कर्डिले म्हणाले की, अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली. महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली. सरकारने शेतकरी व रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. 

"हेलिकॉप्टर'मुळे कापले तिकीट 
लोकसभा निवडणुकीतील आठवणींना उजाळा देताना डॉ. विखे पाटील म्हणाले, ""आपले "हेलिकॉप्टर' तेव्हाही होते व भविष्यातही राहील. मात्र, खासदारकीचे तिकीट हेलिकॉप्टरमुळे कापले गेले होते. त्यावेळी मी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत होतो. पुढे काय झाले, हे सर्वांनाच माहित आहे. बरे झाले त्यांचे तिकीट मिळाले नाही. आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा खासदार आहे.'' 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sujay Vikhe Patil reveals his Lok Sabha candidature