डॉ. विखे पाटलांनी केली प्रशासनाची चिरफाड... म्हणाले, व्हा तुम्हीच खासदार, मी राजीनामा देतो

अमित आवारी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पहिल्या तीन महिन्यात तपासण्याच सुरू केल्या नाहीत. या बाबत मी माहिती दिली तर मलाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला. मी न्युरोसर्जन आहे. माझ्या डॉक्‍टरकीच्या शिक्षणाचा उपयोग काय?

नगर ः नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेची कोरोनाच्या मुद्दावरून चांगलीच चिरफाड केली. केंद्र सरकारने कोरोना विषाणूंचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्याला 18 कोटीचा निधी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत दिला. यातील चार कोटी रुपये कोरोना आरोग्य सेवक भरतीसाठी देण्यात आले होते.

या संदर्भात मी एका बैठकीत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना माहिती विचारले. मात्र मला माहिती दिली नाही. खासदाराला केंद्राच्या निधी खर्चासंदर्भात माहिती दिली जात नसेल तर खासदार असून उपयोग काय? खासदारालाच जिल्हा प्रशासन विश्‍वासात घेत नाही. आम्ही लोकप्रतिनिधी असून उपयोग काय? मी राजीनामाच देतो ना, असा आगतिक सवालही त्यांनी केला. 

हेही वाचा - नगरमध्ये रविवारी कोरोना ४०३चा आकडा

जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनीच निवडणुका लढवाव्यात, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

विकासवर्धिनी संस्थेतर्फे कोरोनामुक्‍त नगर अभियानांतर्गत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची संस्थेचे संचालक विनायक देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाखत घेतली.

टेस्ट न करता डिस्चार्ज देतात

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, राज्य शासन सध्या बेड शिल्लक नसल्याने कोरोना रुग्णांना सातव्या दिवसातच कोणतीही तपासणी न करता कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देत आहेत. सात दिवसांत कोरोना रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही. तो घरी जाऊन इतरत्र फिरतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे.

पहिल्या तपासणीत निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. नंतर ते पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. लॉकडाउनच्या काळात पुणे, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरांत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासण्यात करण्यात आल्या. त्यामुळे तेथे आकडेवारी जास्त दिसत होती.

कोविड लॅब सुरू केल्यानंतरच...

जिल्हा प्रशासनाने पहिल्या तीन महिन्यात तपासण्याच सुरू केल्या नाहीत. या बाबत मी माहिती दिली तर मलाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला. मी न्युरोसर्जन आहे. माझ्या डॉक्‍टरकीच्या शिक्षणाचा उपयोग काय? मी आता विळद घाटातील विखे पाटील फाउंडेशनने आमदार संग्राम जगताप, महापालिका यांच्या सहकार्याने कोविड तपासणी लॅब सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. 

कोरोना साधा आजार नाही, मीही तीनदा टेस्ट केली

शासन लॉकडाऊन करीत नसेल तर लोकांनी स्वतःला घरात लॉकडाउन करायला हवे.अत्यावश्यक कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या कुटूंबातील एखाद्या व्यक्‍तीलाच घराबाहेरची सर्व कामे करायला सांगावित. कोराना हा साधा आजार नाही. लक्षणे दिसल्यास तपासणी करून घ्या. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूचे कारण केवळ उशिरा तपासणी व उपचार आहेत. मी स्वतः तीन वेळा तपासणी केली आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Vikhe Patil dissatisfied with district administration