उसाच्या आगारात फुलतेय 'ड्रॅगन फळ' शेती; कोरोनातही मिळाले लाखोचे उत्पन्न

सुनील गर्जे
Monday, 23 November 2020

उसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेवासे तालुक्यात आता विदेशात पिकणार्या ड्रॅगन फळाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग खडके फाटा येथील तुकाराम कल्हापुरे या प्रयोगशील व कृषिनिष्ठ शेतकऱ्याने आपल्या शेतात केला आहे. 

नेवासे (अहमदनगर) : उसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेवासे तालुक्यात आता विदेशात पिकणार्या ड्रॅगन फळाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग खडके फाटा येथील तुकाराम कल्हापुरे या प्रयोगशील व कृषिनिष्ठ शेतकऱ्याने आपल्या शेतात केला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या गेल्या आठ महिन्याच्या लॉकडाऊन काळात 'ड्रॅगन' शेतीनेच त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न देऊन तारले.

ड्रॅगन फळांची लागवड करून त्याचे उत्पादन आपल्या देशात घेणे तसे आव्हानात्मकच. मात्र आधुनिक व तंत्रशुद्ध शेतीची कास धरणारे तुकाराम कल्हापुरे यांनी आपल्या शेतात 2017 मध्ये दीड एकर शेतीत 500 ड्रॅगन फळाच्या झाडांची लागवड केली. या झाडांना ठिबक सिंचन पध्दतीने पाणी दिले. दीड वर्षांनंतर या झाडांना फळे लागण्यास सुरुवात झाली. एक फळ जवळपास 300 ते 450 ग्रॅम वजनाचे असून एका झाडाला 100 फळे लागली आहे. विशेष म्हणजे ड्रॅगन शेती ऑरगॅनिक पद्धतीची आहे.

ड्रॅगन फळाची शेती थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या देशात या मोठ्या प्रमाणात केली जाते. या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून या फळाची भारतात लागवड केली जात आहे. नेवासे फाटापासून सात-आठ किलोमीटर नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडके फाटा येथे कल्हापुरे यांची शेती असून त्यांनी गेल्या तिन वर्षांपासून दीड एकरवर ड्रॅगन फळाच्या झाडांची लागवड केली. ड्रॅगन फळ आरोग्यासाठी लाभदायक असून औरंगाबाद, नगर, वाशी ( मुंबई) या बाजारपेठेत या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

कल्हापुरे यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फळाबरोबरच सीताफळ, आंबा यांच्या अंतर्गत फळबागांचा यशस्वी प्रयोग केले आहे. त्यांना शेती कामात पत्नी आशा, मुलगा ईश्वर व सुन स्वाती यांची मोलाची साथ मिळते.

स्वतःच केली ड्रॅगन रोप वाटिका!
तुकाराम कल्हापुरे त्यांनी डँगन फळाचे रोपटे सोलापूर जिल्ह्यातून आणले. या फळाच्या झाडाची लागवड करुन त्यातून उत्पादन घेण्याचे त्यांनी आव्हान स्विकारले. थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असलेल्या ड्रॅगन फळांची यशस्वी शेती तर त्यांनी केलीच मात्र त्यांनी गेल्या वर्षीपासून स्वतःच ड्रॅगन रोपवाटिकाही करून विक्री सुरू केली. 

ड्रॅगन फळ विदेशी असलेतरी आपल्याकडील हवामानात चांगले उत्पादन घेणे शक्य आहे. कोरोनाच्या काळात ड्रॅगनफळ शेतीनेच आम्हाला मोठा आर्थिक आधार दिला.रोपवाटिकेतूनही चांगले उत्पन्न मिळते. 
- तुकाराम कल्हापुरे, खडके फाटा, ता. नेवासे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dragon fruit cultivation is increasing in Nevasa taluka