
पाण्याची बचत करण्यासाठी शासनाकडून ठिबक सिंचनाला प्रोत्साहन दिले जात आहे. हेक्टरी 60 हजार रुपये ठिबक सिंचनाला खर्च येतो.
नेवासे : पाण्याची बचत करण्यासह शेतीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शासनाने ठिबक सिंचन योजनेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, लाल फितीच्या कारभारामुळे ठिबक सिंचन योजनेलाच खोडा बसत आहे.
गेल्या वर्षी नेवासे तालुक्यातून आलेले, तीन हजार 200 शेतकऱ्यांचे सर्व प्रस्ताव मंजूर झाले. त्यातील दोन हजार तीनशे शेतकऱ्यांना सात कोटींचे अनुदान मिळाले. दरम्यान, निधी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नऊशे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
पाण्याच्या अतिवापरामुळे शेती क्षारयुक्त होण्याचे प्रमाण वाढले. पाण्याचा जादा उपसा होत असल्यामुळे भूजल पातळी घटत आहे. त्यामुळेच ठिबक सिंचनाची योजना शासनाने सुरू केली आहे.
हेही वाचा - बघा आता हे, मनोलीत शिपाईच झाला सरपंच
हेक्टरी खर्चाच्या 45 ते 54 टक्के अनुदान मिळते. यापुढे जाऊन, शासनाने ठिबक सिंचनाचे अनुदान 80 टक्के करण्याची घोषणा केली; पण प्रत्यक्षात त्याचा आदेशच निघाला नाही. नेवासे तालुक्यातील नऊशे शेतकरी वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना अनुदान लवकर मिळावे, यासाठी शासन व प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
असा खर्च, असे अनुदान
पाण्याची बचत करण्यासाठी शासनाकडून ठिबक सिंचनाला प्रोत्साहन दिले जात आहे. हेक्टरी 60 हजार रुपये ठिबक सिंचनाला खर्च येतो. त्यापैकी मोठ्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी खर्चाच्या 45 टक्के, तर अल्पभूधारक, मागासवर्गीय शेतकऱ्यांना 55 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. अहमदनगर
"नेवासे तालुक्यातील उर्वरित नऊशे प्रस्तावांना अडीच कोटी रुपयांच्या निधीमंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. हे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- दत्तात्रेय डमाळे, तालुका कृषी अधिकारी, नेवासे
संपादन - अशोक निंबाळकर