हॅलो १०८वाले...इथे दोन मर्डर झालेत लवकर या...दाजीबाने दिली खबर मग..

सुनील गर्जे
Tuesday, 4 August 2020

रुग्णवाहिकेतून धूम ठोकतांना या व्यक्तीला अनेकांनी पाहिले. मात्र ती  व्यक्ती  'कोरोना पॉझिटिव्ह' असल्याच्या अफवेने त्याच्या जवळ कोणी जायाची हिम्मत कोणीच केली नाही.

नेवासे : हॅलो 108 का.. मॅडम तेलकुडगावात लई मारामाऱ्या  झाल्यात... एक-दोन मर्डर झालेत.. मला पण लई मारलंय...  लई जखमी झालोय मी.. आंबूलन्स अर्जंट पाठवा...  अशी खबर मिळताच काही मिनिटांतच सायरन वाजवत रुग्णवाहिका हजर घटनास्थळी गेली.    

पंधरा दिवसंपूर्वीच तेलकुडगाव येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने घाबरलेल्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच्या आवाजाचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यात सोमवारी (ता. ४) सायंकाळी पुन्हा रुग्णवाहिकेचा आवाज कानी आल्याने पुुन्हा  ग्रामस्थांच्या ह्रदयाचे ठोके वाढले.  

हेही वाचा - काँग्रेसच्या दबावामुळे मिसाबंदीवानांची पेन्शन केली बंद

रुग्णवाहिका आवाज करीत इतक्या जोरात आली आणि गावच्या चौकातच का थांबली म्हणून चार-पाच तरुण मोठ्या हिमतीने पुढे आले. त्यांनी रुग्णवाहिका चालकास काय 'भानगड' आहे. असे लांबूनच विचारले.

चालकाने त्यांना सर्व हकीगत सांगितली. या तरुणांनी कोरोनाच्या भीतीने दुरूनच रुग्णवाहिकेकडे पाहणाऱ्या आपल्या मित्रांना 108 चा किस्सा सांगितला. त्या ठिकाणी 100-150 ग्रामस्थ जमा झाले. चौकशी केली असता गावच्या जावयानेच हा फोन केल्याचे कळले.

तो म्हणाला, मीच फोन केला होता. तुम्ही इथून जाऊ नका, आता दोन-जार मर्डर होणार आहेत,अशी तो मद्यपि जावई बडबड करायला लागला. त्याने आवाज वाढवल्यावर उपस्थित जमावाने अख्खा राग गावच्या जावयावर काढला. त्याला रुग्णवाहिकेत कोंबूून  कुकाणे पोलिसांच्या ताब्यात देण्याची तयारी केली. 

रूग्णवाहिका कुकाणे पोलीस दुरक्षेत्रासमोर थांबताच सासुरवाडीच्या लोकांकडून मिळालेल्या येथेच्छ पाहुणचारामुळे पुरती उतरलेल्या या जावयाने दरवाजा उघडून धूम ठोकली. 

रुग्णवाहिकेतून धूम ठोकतांना या व्यक्तीला अनेकांनी पाहिले. मात्र ती  व्यक्ती  'कोरोना पॉझिटिव्ह' असल्याच्या अफवेने त्याच्या जवळ कोणी जायाची हिम्मत कोणीच केली नाही. अंधाराचा फायदा घेऊन ही व्यक्ती कुकाणे येथून जवळच असलेल्या माका (ता.नेवासे) या आपल्या गावी निघून गेली. 
 

108 वाल्यांसोबत ४२०पणा 
कुकाणे येथील एकमद्यपी  व्यक्ती हा नगर येथे सासुरवाडीला राहायला गेला. दरम्यान तो नगरहून कुकण्याला येत असे. मात्र, रात्री उशिरापर्यंत दारूने तर्र हातून तो नगरला घरी जाण्यासाठी तो 108 ला फोन करून कुकाणे येथील वेगवेगळी ठिकाणे सांगून  त्या ठिकाणी  अपघात झाला अाहे. त्यात एकजण बेशुद्ध आहे. गाडी लवकर पाठवा, त्याला नगरला हलवायचे आहे. असे सांगून त्याने दहा ते बारा वेळेस 108 ची फसवणूक केली. मात्र, 108 रुग्णवाहिकेवर कुकाणे येथील डॉक्टर असल्याने त्यांनी हा प्रकार ओळखून त्याला नगर म्हणून थेट कुकाणे पोलीस चौकीत नेले होते. पोलिसांचा पाहुणचार भेटल्यानंतर त्या व्यसक्तीने हा प्रकार बंद केला.

 

"संबंधित व्यक्तीने दारूच्या नशेत 108 च्या कंट्रोल रूमला कॉलकरून रुग्णवाहिका मागवली. असे प्रकार अनेक वेळा होतात. अत्यावश्यक व जलद सेवा असल्याने आम्हालाही जाणे टाळता येत नाही.  अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.
-डॉ. अरुण वाबळे, वैद्यकीय अधिकारी, (108) कुकाणे
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The drunken man called an ambulance for no reasonThe drunken man called an ambulance for no reason