झेंडूची विक्री वाढल्याने भाव वधारला; अकोलेत फुलं घेण्यासाठी ग्राहक बांधावर 

शांताराम काळे
Saturday, 14 November 2020

अकोले तालुक्‍यातील झेंडूचे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांच्या फुलांना दिवाळीत चांगला भाव मिळाला.

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्‍यातील झेंडूचे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांच्या फुलांना दिवाळीत चांगला भाव मिळाला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असल्याचे फुलशेती करणारे शेतकरी प्रकाश महाले यांनी सांगितले. 

दिवसभर बांधावर ग्राहक येत असल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब शेतातच काम करताना दिसते. धनत्रयोदशी असल्याने फुलांना सकाळपासून चांगला भाव मिळाला. शंभर ते दीडशे रुपये किलोने झेंडूच्या फुलांची विक्री अकोले, राजूर, कोतूळ, समशेरपूर बाजारात सुरू होती.

मध्यंतरी भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र, दसऱ्यापासून फुलांनी शंभर रुपयांचा भाव टिकवून धरल्याने शेतकरी झेंडूच्या शेतीतून चांगले उत्पन्न घेऊ लागला आहे. जामगावमध्ये दोन एकरांत लावलेल्या झेंडूचे चांगले उत्पादन झाल्याने तोडणीच्या कामाला वेग आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीही पालकांना झेंडूतोडणीच्या कामाला मदत करताना दिसला. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Diwali flower prices increased in Akole taluka