मेरे पास मेरा बाप है... प्रशांत पाटील गडाखांच्या डायलॉगने नेवाशात धुमाकूळ

विनायक दरंदले
Thursday, 21 January 2021

अनेक अडथळे पार करीत साहेबांनी मुळा कारखाना व एज्युकेशन संस्थेचे रोपटे लावले. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. या दोन्ही संस्थांमुळे परिसर आणि तालुक्याचे अर्थकारण मोठ्या उंचीवर गेले आहे.

सोनई (अहमदनगर): ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण 
नेवासे तालुका भगवामय केल्यानंतर अशक्य वाटणारी 
मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली. 
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत पाटील गडाख यांनी ही किमया साधली आहे. अर्थातच त्यांच्या मागे आहेत  'साहेब'. म्हणजेच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख.

अनेक अडथळे पार करीत साहेबांनी मुळा कारखाना व एज्युकेशन संस्थेचे रोपटे लावले. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. या दोन्ही संस्थांमुळे परिसर आणि तालुक्याचे अर्थकारण मोठ्या उंचीवर गेले आहे. राज्यात प्रगतीपथावर असलेल्या पहिल्या आठ-दहा कारखान्यात 'मुळा'चे नाव आहे. या कारखान्यास उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा - अलंग गड आला आजोबांना शरण

मंत्री गडाख यांनी सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडत क्रांतीकारी पक्षाचा मुकूट डोक्यावर घेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या. या पहिल्याच प्रयत्नांत त्यांना मोठे यश मिळाले होते. त्याच माध्यमातून त्यांनी हातातून गेलेली आमदारकी पुन्हा मिळविली. शिवसेनेला दिलेला पाठिंबा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देवून गेला.

तो डायलॉग प्रशांत पाटलांचा

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, बंधू प्रशांत, पत्नी सुनीता यांच्यासह कुटुंब व सोनईकरांनी मोठे कष्ट घेत गेलेले आमदारपद मिळविण्यात यश मिळविले. प्रशांत पाटील गडाख यांनी भाषणात मारलेला " मेरे पास मेरा बाप है" हा डायलॉग चांगलाच गाजला होता. या डायलॉगने राजकीय धुमाकूळ घातलाय. त्यांचे वडील यशवंतराव हे  सक्रिया राजकारणात नाहीत. सहकाराच्या राजकारणातूनही त्यांनी निवृत्ती घेतलीय. परंतु त्यांच्याच विचारांच्या आणि कामामुळे गडाख परिवाराला यश मिळतेय. याची जाणीव दोन्ही बंधूंना आहे. त्यामुळेच आपल्या वडिलांविषयी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करतात.

वडिलांचा घेतला आशीर्वाद

'मुळा' कारखान्यासाठी १३८ अर्ज होते. सर्वांना
वाटले निवडणूकच होणार मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मंत्री गडाख यांनी आपले कौशल्य पणाला लावून १३८ पैकी ११७ अर्ज मागे घेत निवडणूक बिनविरोध करून दाखविली. यानंतर त्यांनी सर्वप्रथम वडील यशवंतराव यांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेतला. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Gadakh brothers, Nevasa became the stronghold of Shiv Sena