त्या बातमीने बनवलं शेतकऱ्याच्या पोराला आयएएस

वसंत सानप
Tuesday, 4 August 2020

महेशचे प्राथमिक शिक्षण मोहरी तालुका जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण आनंद विद्यालयात झाले. 

जामखेड : जामखेड तालुक्यातील मोहरी येथील शेतकऱ्याचा मुलगा महेश गिते पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाने गिते कुटुंबासह गावची व तालुक्याची मान उंचावली आहे. 

जामखेड तालुक्यातील मोहरी येथील बाबासाहेब रघुनाथ गिते सोजरबाई या शेतकरी दाम्पत्याला कुटुंबातील मनिषा, महेश आणि मंगेश अशी मुले आहेत. मनीषा यांचा विवाह सैनिक तुकाराम मिसाळ यांच्यासोबत झाला आहे. छोटा मंगेश कला शाखेचा पदवीधर आहे. महेशने बीएससी अॅग्रीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

हेही वाचा - काँग्रेसमुळेच ठाकरे सरकारने मिसा पेन्शनचा निर्णय रद्द केला

महेशने युपीएससी परीक्षेत ३९९ क्रमांकाची रँक मिळवली आहे. महेशचे प्राथमिक शिक्षण मोहरी तालुका जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण आनंद विद्यालयात झाले तर नगरच्या न्यू आर्टस महाविद्यालयातून त्याने बारावी केले. अॅग्रीचेकल्चरचे शिक्षण पुणे येथे केले. 2016साली महेश बीएससी ऍग्री उत्तीर्ण झाला. 2017मध्ये महेशने पुण्यातच एम. एस्सी.ला प्रवेश घेतला. मात्र, एमएस्सीमध्ये महेश काही रमला नाही.

त्या घटनेमुळे ठरवलं

आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची . त्यासाठी अभ्यास करायचा. सलग तीन वर्ष सातत्याने पुणे येथे राहून अभ्यास केला. तो यशस्वी झाला . लहानपणी महेशने टीव्हीवर शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाल्याची बातमी ऐकली होती. तेेव्हाच ठरवलं होतं; आपणही कलेक्टर व्हायचं; आपणही शेतकऱ्याचा मुलगा आहोत. आपणही कलेक्टर होऊ शकतो, असा विश्वास महेशमध्ये निर्माण झाला. 

काकांनी दिली प्रेरणा आणि माहिती

महेशचे काका दादासाहेब गिते यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवले आहे.  ते तहसीलदार आहेत. त्यांनी नगर जिल्ह्यात तहसीलदार म्हणून राहुरी येथे सेवा केली. सध्या ते सिंधुदुर्ग येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महेशने केद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला. त्यांनीच खऱ्या अर्थाने महेशला प्रेरणा दिली. महेशने स्वतःचे पाहिलेले स्वप्न यानिमित्ताने पूर्ण केले.

मुलाखतीला दिल्लीला गेल्याने केले क्वारंटाईन

महेश 23 जुलैला दिल्लीवरून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती देऊन पुण्यात परतला होता. तेव्हापासून त्याला पुण्यात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला आहे. याच दरम्यान पुढच्या परीक्षेची तयारी त्याने  सुरू केली होती. मात्र, त्याला एका मित्राचा आज फोन आला. महेश अभिनंदन! तू केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे खूप आनंद झाला. महेशच्या आनंदाला पारावार उरला नाही!

आई-वडिलांना मी काय झालो हे कळलंच नाही

महेशने यश मिळाल्याचा पहिला फोन शेतकरी असलेल्या आई-वडिलांना आणि उपजिल्हाधिकारी पदावर असलेल्या काकांना केला. काका उपजिल्हाधिकारी असल्याने महेशला मिळालेले यश किती मोठे आहे, हे ते समजू शकले. मात्र, शेतकरी असलेल्या आई वडिलांना महेश आता कोणीतरी मोठा माणूस होणार एवढेच समजले. त्यांना या यशाबद्दल काहीच अंदाज नाही, असे महेशने ई सकाळशी बोलताना सांगितले.

असा केला अभ्यास

" ग्रामीण भागातील मुलांनी न घाबरता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाची तयारी केली पाहिजे. प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर यश निश्चित मिळतं. मी सलग तीन वर्षे सातत्याने , प्रामाणिकपणे अभ्यास केला, मला पहिल्याच प्रयत्नात आय.ए.एस.होण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी स्वतःला कमी न समजता कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे.

- महेश गिते, यूपीएसी उत्तीर्ण

- संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to that news, the farmer's son became the Collector