esakal | Ahmednagar : आघाडीतील पक्षांना गटबाजीचे ग्रहण
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi

आघाडीतील पक्षांना गटबाजीचे ग्रहण

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : राज्यात गुण्यागोविंदाने नांदणारे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्ष तालुक्यात मात्र अंतर्गत गटबाजीने पोखरत आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये पक्षीय राजकारण अलबेल नाही. काँग्रेसमध्ये कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने उभी फूट दिसते. शिवसेनेचे राजकीय अस्तित्व भलेही कमी असले, तरी त्यांच्यात गट-तट आहेत. या पक्षांतील नेत्यांचीच या गटबाजीला मूकसंमती असल्याने निष्ठावंत कार्यकर्ते सैरभर आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. विरोधी पक्ष व त्यांच्या नेत्यांना राज्यात सत्ता असल्याचा फायदा मिळतोय. राज्यात सत्तेत असणारे सामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत मैदानात उतरतील, अशी अपेक्षा होती. तीही फोल ठरतेय. या तिन्ही पक्षांना गटबाजे ग्रहण लागले असून, नेत्यांचे मात्र अलबेल सुरू असून, निष्ठावंत मात्र चहाच्या कपाला महाग असल्याचे विरोधाभासी चित्र आहे.

राष्ट्रवादीत माजी आमदार राहुल जगताप व प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार यांच्यात गटबाजी असल्याचे खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच अप्रत्यक्ष निदर्शनास आणले. एकाच चौकात दोघांची कार्यालये, पक्षाचे पदे वाटताना आपल्याच कार्यकर्त्याला ती कशी मिळतील, यासाठी लावलेली फिल्डिंग आणि मध्यंतरी तालुकाध्यक्षांनी उघडपणे जाहीर केलेली नाराजी, यावरुन राष्ट्रवादीच मोठा अंतर्गत संघर्ष सुरू आहे.

काँग्रेसमध्ये कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे विरुद्ध सगळी काँग्रेस, अशीच स्थिती आहे. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, तालुकाध्यक्ष दीपक भोसले, पक्षाचे पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब शेलार व जिजाबापू शिंदे हे उघडपणे नागवडे यांना आव्हान देत आहेत. ज्या शिवाजीराव नागवडे यांनी काँग्रेस तालुक्यात पाचपुते सक्षम विरोधक असताना जीवंत ठेवली, त्याच पक्षाची अवस्था आज नेत्यांमुळे वाईट होते की काय, अशी भीती कार्यकर्त्यांना वाटतेय.

हेही वाचा: शहरातील एलईडीची लवकरच प्रक्रिया पूर्ण

ठराविक मर्यादेच्या पलीकडे जाऊ न शकलेली शिवसेनाही सध्या गटबाजीत आघाडीवर आहे. तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे विरुद्ध नंदकुमार ताडे यांच्या झडणाऱ्या आरोपांच्या फैरी वेगळ्या वळणार आहेत. मोजकेच कार्यकर्ते जपणाऱ्या या पक्षातील नेत्यांना वेळीच हे थांबवावे लागेल अन्यथा कार्यकर्ते त्यांनाच बाजूला सारतील अशी चर्चा आहे.

नेत्यांना त्यांच्या कामाने वेळ मिळत नसल्याने अवमेळ होतोय. मात्र त्यात लवकरच सकारात्मक बदल होईल. नेत्यांनी ठराविक कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा निष्ठावंत शोधले तर पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच राहील.

हरिदास शिर्के, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

आमच्यात गटबाजी आहे, असे म्हणता येणार नाही. कारखाना निवडणुकीपुरता राजेंद्र नागवडे यांना आमचा विरोध आहे. मात्र आम्ही सगळेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच विचारांचा आदर करणारे आहोत.

दीपक भोसले, तालुकाध्यक्ष काँग्रेस.

loading image
go to top