‘बालपण’च्या 230 विद्यार्थ्यांचा पर्यावरणाची जागृती करणारा गणेशोत्सव

आनंद गायकवाड
Sunday, 23 August 2020

संगमनेर तालुक्यातील पानोडी व आश्वी खुर्द येथील ज्ञानविद्या बहुउद्देशीय संस्थेच्या बालपण स्कूलमधील विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी केलेल्या पर्यावरण जागृतीच्या संस्काराचा परिणाम म्हणून, विद्यालयातील सुमारे 230 विद्यार्थ्यांनी स्थानिक साहित्यातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करुन त्यांची आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा केली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील पानोडी व आश्वी खुर्द येथील ज्ञानविद्या बहुउद्देशीय संस्थेच्या बालपण स्कूलमधील विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी केलेल्या पर्यावरण जागृतीच्या संस्काराचा परिणाम म्हणून, विद्यालयातील सुमारे 230 विद्यार्थ्यांनी स्थानिक साहित्यातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करुन त्यांची आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा केली आहे.

बालपण विद्यालयात शालेय अभ्यासक्रमाव्यतिरीक्त पर्यावरणाबद्दल जनजागृती, वृक्षारोपण आदींचे महत्व बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवण्याचे, संस्कार करण्याचे काम सुमारे तीन चार वर्षांपासून सुरु केले आहे. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. या कठीण काळातही रक्षाबंधनाचा सण पर्यावरण पूरक राख्या तयार करुन विद्यार्थ्यांनी साजरा केला. याशिवाय वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचे धडे गिरवले. या वर्षीचा गणेशोत्सवही आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरवून संस्थेच्या प्रशासनाने त्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना याबाबत मार्गदर्शन केले. 

गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवानंतर नदीपात्रात न विरघळलेल्या पीओपीच्या मूर्तींचा खच पडला होता. पर्यावरणाची हानी करणाऱ्या विद्रुपीकरण झालेल्या मूर्तींचे रंग व इतर रासायनिक साहित्यामुळे जलप्रदुषण झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना देत, यावर मार्ग काढण्यासाठी त्यांच्याच मदतीने यावर शक्य त्या उपाययोजना करण्याचे ठरवले. 
या वर्षी शिक्षकांनी मार्गदर्शन करुन शाडू मातीऐवजी स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणारी शेतातील काळी व लाल मातीचा वापर करुन, गणेशमूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला.

विश्व पर्यावरण परिषदेचे अध्यक्ष प्रा. गणेश चन्ना व सचिव अनमोल शर्मा यांच्या मार्गदर्शनातून पर्यावरणपूरक गणपती साकारण्यात आले. स्थानिक साहित्यातून मुळात निराकार असलेल्या गणेशाची आपल्या मनातील रुपे सुमारे 230 विद्यार्थ्यांनी साकारली. पानाफुलांच्या वापरातूनसजावट करण्यात आली. या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करुन, त्यांचे विसर्जनही घरातच कुंडीत करुन त्यावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या शाळेच्या परिसरातील सुमारे 15 ते 20 गावातील विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांची पर्यावरणविषयक जागृती वाढल्याची माहिती बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे यांनी दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ecofriendly Ganeshotsav for 230 students of Balpan School