esakal | Ahmednagar : ‘स्थानिक’मध्ये आघाडी - जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar : ‘स्थानिक’मध्ये आघाडी - जयंत पाटील

Ahmednagar : ‘स्थानिक’मध्ये आघाडी - जयंत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाआघाडीतील कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित लढण्यास प्राधान्य राहील, असे संकेत जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

येथे पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘‘राज्यात आगामी काळात काही नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तिन्ही पक्षांनी एकत्र राहण्याला प्राधान्य राहील. काही ठिकाणी या तिन्ही पक्षांत आघाडी होत नसेल, तर स्थानिक पातळीवरील नेत्यांना निवडणुकांमध्ये आघाडी करण्याबाबत अधिकार दिले जातील.’’

भाजपकडून ‘ईडी’चा गैरवापर होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आकसाने कारवाई सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.किरीट सोमय्या यांनी ‘निम्मे मंत्रिमंडळ दवाखान्यात राहील,’ असे वक्‍तव्य केले आहे. या वक्‍तव्याचा उलटा अर्थ, सोमय्यांना हे कसे माहिती आहे, असा विचार केला, तर ‘ईडी’ आणि सीबीआय हेच (भाजपवाले) चालवितात. ‘ईडी’ हे आता भाजपचे कार्यालय झाले आहे. यापूर्वी काहींना ‘ईडी’ने नोटिसा काढल्या होत्या. ते भाजपमध्ये गेल्यावर या प्रकरणाचे काय झाले, असा प्रश्‍नही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

प्रभागरचना निर्णयात बदल नाही

नगरपालिका, महानगरपालिकांसाठी तीन सदस्यांची प्रभागरचना करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे चार सदस्य प्रभागरचनेसाठी आग्रही होते. आम्ही दोन सदस्य प्रभागरचनेसाठी आग्रही होतो. अखेर तीन सदस्य प्रभागरचना करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. या निर्णयामध्ये आता फेरबदल होणार नाही.’’

loading image
go to top