
ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सौम्य लक्षणे आढळली. त्यांना राहुरी फॅक्टरी येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविले जात होते.
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे श्री विवेकानंद नर्सिंग होममध्ये शासनाने सहा महिने चालविलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी)मध्ये काम केलेल्या 19 कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून काम केले. परंतु, शासनाने विहित केलेले मानधन त्यांना अद्यापि मिळालेले नाही.
कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी चार महिन्यांचे थकित मानधन मिळण्यासाठी तहसीलदार फसियोद्दीन शेख व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना साकडे घातले.
कोरोनाच्या काळात तालुकास्तरावर मोफत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी राज्य सरकारने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये संशयित कोरोना रुग्णांची रॅपिड व आरटी-पीसीआर तपासणी करून, कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या परंतु, लक्षणे नसलेल्या रुग्णांना कृषी विद्यापीठातील विलगीकरण कक्षात व्यवस्था केली होती.
हेही वाचा - पुणे-नाशिक रस्त्यावर फुलले ताटवे
ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सौम्य लक्षणे आढळली. त्यांना राहुरी फॅक्टरी येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविले जात होते.
करोनाच्या काळात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी धजावत नव्हते. अशा काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कक्षातील साफसफाई, विद्युत व्यवस्था व रुग्णवाहिका चालक म्हणून काम करणाऱ्या 19 कर्मचाऱ्यांना जुलै ते ऑक्टोबर 2019 दरम्यान चार महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही.
राजेंद्र साळुंके, विठ्ठल देवरे, नवीन लोट, निलेश पंडित, सुनिता कोळसे, पुष्पा हारदे, छाया भिंगारे, विजया मोरे, उषा भोसले, नंदा कायगुडे, बेबी दिवे, सुरेखा शिंदे, शोभा आढाव, अशोक ठुबे, गोरख सानप, अतुल मोहोळ, नवनाथ तारडे, समीर शेख व ज्ञानेश्वर टिक्कल यांनी तहसीलदार शेख व राज्यमंत्री तनपुरे यांना लेखी निवेदन देऊन मानधन मिळावे, अशी मागणी केली आहे.
"डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या नर्स, औषध विक्रेता, सफाई कर्मचाऱ्यांना मानधन दिले आहे. नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या संस्थेतर्फे वेतन दिले जाते. त्यांना मानधन देण्याचा प्रश्नच नाही. तशी मागणी माझ्यापर्यंत आलेली नाही.
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी.
नर्सिंग होमच्या डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये पहिले चार महिने स्विपर, स्वच्छता कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांची शासनातर्फे नियुक्ती केलेली नव्हती. शेवटच्या दोन महिने शासनातर्फे कंत्राटी कर्मचारी नेमले. नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी राहून काम केले. त्यांना मानधन मिळावे. यासाठी तहसीलदार यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. - डॉ. विलास कड,
- प्राचार्य, आयुर्वेद महाविद्यालय, राहुरी फॅक्टरी.
संपादन - अशोक निंबाळकर