
मुळातच पुणे, नाशिक मुंबई या औदयोगिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या महानगरांना जोडणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची घनता आहे.
संगमनेर ः संगमनेर तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर लावलेल्या फुलझाडांच्या रंगीबेरंगी ताटव्यांमुळे निर्माण झालेल्या निसर्गसौंदर्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवाशी सुखावत आहेत.
संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या चौपदरी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग खेड सिन्नर एक्स्प्रेस वे लिमीटेड या कंपनीने 3 वर्षांपूर्वी बांधा वापर हस्तांतरित करा या तत्वावर निर्मीती करुन तो वाहतुकीसाठी खुला केला.
हेही वाचा - श्रीरामपूरमध्ये होते स्मार्ट पोलिशिंग
या प्रमुख मार्गावर दोन स्वतंत्र लेन असल्याने, वाहन चालकांच्या सोयीसाठी दुभाजकांची रचना केलेली आहे. या दुभाजकावर ठेकेदार कंपनीने लाईट कटर म्हणून लावलेली शोभेची व फुलझाडे चांगलीच बहरली आहेत. पावसाळा संपून हिवाळा सुरु झाल्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी हा पर्यटक तसेच भटक्यांसाठी आदर्श काळ असतो.
मुळातच पुणे, नाशिक मुंबई या औदयोगिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या महानगरांना जोडणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची घनता आहे. तालुक्यातील चंदनापुरी व एकल व कऱ्हे घाटातून जाणाऱ्या य़ा मार्गावरील अनेक सौंदर्यस्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.
या मार्गावर दोन्ही मार्गिकेवरुन रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनांच्या तीव्र प्रकाश झोताचा त्रास समोरच्या वाहनचालकांना होवू नये यासाठी लाईट कटर म्हणून प्लॅस्टीकच्या कृत्रीम साधनांऐवजी विविध प्रकारची शोभेची व फुलझाडे लावली आहेत. त्यात लाल, गुलाबी, सफेद रंगाची बोगनवेल, पिवळ्याधमक फुलांची टिकोमा, विविधरंगी कन्हेर, टिव्हीसिया अशा वर्षभर फुलणाऱ्या वनस्पतींचा वापर केला आहे.
ही झाडे चांगली वाढल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा शिणवटा या रंगिबेरंगी फुलांच्या दर्शनाने दूर होतो. याची नियमित देखभाल होत असून सध्या वाळलेले गवत व अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या कापण्याचे काम सुरु असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अमित राणा यांनी सकाळशी बोलताना दिली.