esakal | अतिक्रमणधारकांनी रोखले पाथर्डी शहरातील राज्यमार्गाचे काम
sakal

बोलून बातमी शोधा

Encroachers block state highway work in Pathardi City

वाढलेले अतिक्रमण काढावे यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व नगरपालिका प्रशासनाने संबंधित दुकानदारांना वाढीव बांधकाम काढून घेण्यास तीन वेळा समज देऊनही अद्याप 'त्या' अतिक्रमण धारकांनी प्रशासनाच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने प्रगतीपथावर असलेले राज्यमार्गाचे काम रखडले आहे.

अतिक्रमणधारकांनी रोखले पाथर्डी शहरातील राज्यमार्गाचे काम

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गाचे काम चक्क अतिक्रमणधारकांनी रोखले आहे. वाढलेले अतिक्रमण काढावे यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व नगरपालिका प्रशासनाने संबंधित दुकानदारांना वाढीव बांधकाम काढून घेण्यास तीन वेळा समज देऊनही अद्याप 'त्या' अतिक्रमण धारकांनी प्रशासनाच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने प्रगतीपथावर असलेले राज्यमार्गाचे काम रखडले आहे. 

कल्याण ते विशाखापट्टणम, निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 तसेच शिर्डी ते हैदराबाद राज्यमार्ग क्रमांक 59, तसेच बारामती ते औरंगाबाद राज्यमार्ग क्रमांक 54 , पाथर्डी शहरातून जात आहेत. हे प्रमुख तीन मार्ग शहारातून जात असल्याने भविष्यात शहराच्या वैभवात भर पडणार आहे. विकासालाही चालना देणारे ठरणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, राहुरी, तिसगाव, पाथर्डी, चिंचपूरईजदे आदी गावांतून हैदराबादकडे जाणारा शिर्डी- हैदराबाद राज्यमार्ग पाथर्डी शहरातील नाईकचौक, अजंठाचौक मार्गे मोहटा, चिंचपूरईजदे कडे जातो आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या शहरातील प्रमुख चौक असलेल्या नाईकचौक ते अजंठाचौक तसेच चिंचपूररोड वरील रस्त्याचे काम रखडले आहे. अन्य रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून पूर्णत्वाकडे असतांना शहरातील रस्त्याच्या कामाला अतिक्रमणधारकांमुळे खीळ बसली आहे. अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना तसेच नागरिकांना प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, नगर परिषदचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी तीन वेळा समक्ष जाऊन संबंधित अतिक्रमण काढून घ्यावे याबाबत सांगितले आहे.

वारंवार प्रशासनाने सांगूनही संबधीत दुकानदार त्याकडे काणाडोळा करित असल्याने रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत रखडले आहे. मोठ्या प्रमाणात रहदारी, वर्दळ असलेले शहरातील नाईक व अजंठा चौक दरम्यानचा रस्ता अतिक्रमणधारकांनी व्यापून टाकला असून पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा फटका प्रवाशांना, तसेच काही फुटावर असलेल्या उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या-जाणाऱ्या रुग्णवाहिकांना बसत आहे. रस्त्यावर होणाऱ्या गर्दीतून वाहनांना वाट शोधावी लागत आहे. नव्याने झालेल्या रस्त्यावरचं काहींनी दुकानदारी थाटून रस्ता अडवला आहे. 

काही व्यापाऱ्यांचे अतिक्रमण आहे. त्यांना अतिक्रमण काढुन घेण्याचे सांगितले आहे. कारवाई करुन अतिक्रमण काढावेच लागणार आहे. माणुसकी दाखवली आहे आता कायदाही समजावुन सांगावा लागेल अतिक्रमण स्वतः हुन काढुन घेण्याची वाट पाहीली आहे.कायद्याने तर सर्वजन सारखेच असतात.
- देवदत्त केकाण, प्रांतअधिकारी, पाथर्डी 

संपादन : अशोक मुरुमकर