शेतीमित्रांचे प्रस्ताव गेले मातीत, वर्षभरापूर्वीच संपली मुदत

सूर्यकांत नेटके 
Thursday, 21 January 2021

कृषीमित्रांच्या नियुक्‍त्यांसाठी ग्रामपंचायतींनी मासिक सभेत केलेले ठरावही अडगळीत पडले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. काही गावांत सत्तांतर झाले.

अहमदनगर : गावपातळीवर शेतीविषयक तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी, तसेच कृषी विभाग व शेतकऱ्यांमध्ये दुवा म्हणून काम करणारे शेतीमित्रच जिल्ह्यात बेदखल झाले आहेत. मुदत संपूनही कृषी विभागाकडून शेतीमित्रांच्या नियुक्‍त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे नियुक्तीसाठी ग्रामपंचायतींनी दिलेले ठरावही अनेक महिन्यांपासून अडगळीत पडले आहेत. नियुक्‍त्या न करण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठीयेथे क्लिक करा 
 
गावपातळीवर कृषीविषयक तंत्रज्ञान पोचविणे, कृषी विस्तारकार्यास मदत करणे, कृषी व कृषी संलग्न नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, हवामान, नैसर्गिक आपत्ती यांसह तातडीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे, यासाठी कृषी विभागाच्या 'आत्मा'अंतर्गत दोन महसुली गावांत एका शेतीमित्राची दोन वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. नगर जिल्ह्यात असे 800 शेतीमित्र नियुक्त केले जातात. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या मासिक सभेचे ठराव आत्मा विभागाकडे पाठविले आहेत. मात्र, मुदत संपूनही शेतीमित्रांच्या नियुक्‍त्या केल्या जात नसल्याने, कृषी विभागाकडून शेतीमित्रच बेदखल झाल्याचे दिसते. कृषीमित्रांच्या नियुक्‍त्या रखडण्यामागील कारणही सांगितले जात नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
कृषीमित्रांच्या नियुक्‍त्यांसाठी ग्रामपंचायतींनी मासिक सभेत केलेले ठरावही अडगळीत पडले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. काही गावांत सत्तांतर झाले. त्यामुळे कृषीमित्रांच्या नियुक्‍त्यांसाठी नव्याने ठराव होण्याचीही शक्‍यता आहे. तसे झाल्यास कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे पूर्वीच्या अनेकांची संधी हुकणार आहे. 
 
मुदत संपलेल्या शेतीमित्रांची संख्या 

नगर : 60, पारनेर : 65, पाथर्डी : 70, कर्जत : 60, जामखेड : 43, श्रीगोंदे : 57, श्रीरामपूर : 27, राहुरी : 49, नेवासे : 65, शेवगाव : 55, संगमनेर : 86, अकोले : 93, कोपरगाव : 40, राहाता : 30. 

यांची केली जाते निवड
 
- 40 वर्षांपेक्षा कमी वय, प्रगतीशील, पुरस्कारप्राप्त शेतकरी 
- कृषीच्या विस्तार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी स्वयंप्रेरणेने काम करणारी व्यक्ती 
- कृषी पदविकाधारक, पदवीधारक व ते उपलब्ध न झाल्यास किमान माध्यमिक शिक्षण झालेला शेतकरी 
- पूर्ण वेळ शेती करणारा शेतकरी; परंतु कृषीज्ञान आवश्‍यक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after the deadline no appointments have been made by the agriculture department