वादात मध्यस्थी केल्याने माजी सैनिकाला बेदम मारहाण

आनंद गायकवाड
Thursday, 21 January 2021

या वादातून मंगळवारी विलास कासार याने गैरकायद्याची मंडळी जमवून, रामभाऊचा मुलगा गोकुळ व त्याच्या पत्नीला मारहाण करीत 

संगमनेर ः चुलत भावाशी झालेल्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून माजी सैनिकाला बेदम मारहाण केली. त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांनाही मारहाण केल्याची घटना तालुक्यातील निमज येथे मंगळवार ( ता. 19 ) रोजी घडली.

या बाबत बुधवारी (ता. 20) संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास कासार व फिर्यादीचा चुलतभाऊ भाऊसाहेब रामभाऊ कासार यांच्यात सोमवार ( ता. 18 ) रोजी झालेल्या वादात, सेवानिवृत्त सैनिक पोपट चिमाजी कासार ( वय 45 रा. निमज ) यांनी मध्यस्थी केली होती.

हेही वाचा - मेरे पास मेरा बार है...गडाखांचा डायलॉग हीट 

या वादातून मंगळवारी विलास कासार याने गैरकायद्याची मंडळी जमवून, रामभाऊचा मुलगा गोकुळ व त्याच्या पत्नीला मारहाण करीत असताना, त्या ठिकाणी पोपट कासार त्यांच्या मुलीला दुचाकीवर कॉलेजहून घेवून आले. त्यांना पाहताच आरोपींनी पोपट कासार यांची दुचाकी ढकलून देत, त्यांना हातातील फायटर, व लाकडी काठ्यांनी डोके, हात पायावर जबर मारहाण केली.

त्यांना सोडवण्यासाठी मध्ये आलेली मुलगी सुप्रिया, पत्नी मंदा व आई वडिलांनाही धक्काबुक्की करीत मारहाण केली. या घटनेत जबर मार लागल्याने पोपट कासार जखमी झाले. हे सर्व जण संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या प्रकरणी पोपट कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुलशन भरत कातोरे कुसुम गुलशन कातोरे, विलास बाच्छाव कासार, शकुंतला बाच्छव कासार, मीना विलास कासार, बाच्छाव बाबुराव कासार (सर्व राहणार निमज ता. संगमनेर) तसेच बाळू उत्तम दिघे यांचा मुलगा (नाव माहीत नाही) रा. कोल्हेवाडी तसेच इतर 6 ते 7 अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न तसेच सशस्त्र जमावाने दंगा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-serviceman beaten in Sangamner taluka