चोऱ्यांना पायबंद घालण्यासाठी जामखेडमध्ये माजी सैनिक रस्त्यावर

वसंत सानप 
Sunday, 27 December 2020

माझं गाव, माझं शहर सुरक्षित रहावं, लहान- मोठ्या चोऱ्यांना पायबंद बसावा यासाठी जामखेडचे सेवानिवृत्त सैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

जामखेड (अहमदनगर) : माझं गाव, माझं शहर सुरक्षित रहावं, लहान- मोठ्या चोऱ्यांना पायबंद बसावा यासाठी जामखेडचे सेवानिवृत्त सैनिक रस्त्यावर उतरले आहेत; त्यांनी जामखेड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शहरातील रात्रपाळीच्या गस्तवर तैनात राहण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे पोलिस प्रशासनाह समाजातील विविध घटकांनी स्वागतच केले आहे!

कायदा- सुव्यवस्था चोख रहावी, गुन्हेगारी कमी व्हावी याकरिता पोलिसांच्या मदतीला माजी सैनिकांनीही रस्त्यावर उतरावे, असे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अवहान केले. या आवाहन सकारात्मक प्रतिसाद देत जामखेडच्या माजी सैनिकांनी पोलिसांसोबत रस्त्यावर उतरुन रात्रीच्या गस्तपाळीसाठी पोलिसांना मदत करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे राज्यातील पहिले माजी सैनिक जामखेडचे ठरताहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जामखेड येथे माजी सैनिकांची तालुकास्तरीय बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, 'माजी सैनिक संघटने' चे तालुकाध्यक्ष बजरंग डोके व तालुक्यातील माजी सैनिक उपस्थितीत होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली तर पोलिस प्रशासनाला मदत करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही झाला.

आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा देशसेवेसाठी दिल्यानंतर अंगी असलेली शिस्त, देशप्रेम व समाजहिताची भावना कायम ठेवून सेवानिवृत्ती नंतरही जामखेड तालुक्यातील सर्वच माजी सैनिकांनी रात्रीच्या वेळी पोलिसांच्या बरोबरीने गस्तीसाठी काम करण्याची दाखवलेले औदार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. त्यांच्यापासून नवीन पिढीने प्रेरणा घेऊन पोलिसांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला तर तालुक्यातील भुरट्या चोरांना पायबंद बसेल. कायदा सुव्यवस्था चोख राहण्यास मोठी मदत होईल. हे मात्र निश्चित.

पोलिस निरिक्षकांकडून माजी सैनिकाच्या निर्णयाचे स्वागत आणि सहकार्यची ग्वाही!
जामखेड शहराचा वाढता विस्तार आणि विखुरलेला तालुका पहाता उपलब्ध असलेले पोलिसांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी 'पेट्रोलिंग' करताना मोठी कसरत करावी लागते. अशा वेळी जामखेड तालुक्यातील माजी सैनिकांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे चोरांचा बंदोबस्त करून शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मोठी मदत होईल. तसेच माजी सैनिकाच्या असलेल्या आडचणी सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वोतपरी पोलिस प्रशासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही गायकवाड यांनी दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex servicemen on the road in Jamkhed to curb thefts