बांधकाम विभागाच्या सूचनेला ठेकेदाराकडून केराची टोपली; केबलसाठी साइडपट्ट्यांचे खोदकाम

संजय आ. काटे
Friday, 4 December 2020

ग्रामपंचायतींना ऑनलाइन पद्धतीने जोडण्यासाठी टाकली जाणारी महानेट प्रकल्पातील मोबाईल केबल आता प्रवाशांसाठी अडचणीची ठरत आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : ग्रामपंचायतींना ऑनलाइन पद्धतीने जोडण्यासाठी टाकली जाणारी महानेट प्रकल्पातील मोबाईल केबल आता प्रवाशांसाठी अडचणीची ठरत आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्या खोदून केबल टाकण्यात येत आहे.

अशा पद्धतीने काम करू नये, अशी सूचना असतानाही, याचे पालन न झाल्याने बांधकाम उपविभागाने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, कुठलीही परवानगी नसताना थेट रस्ते खोदूनही, पालिकेकडून कुठलीही हालचाल दिसत नाही. 

महानेट प्रकल्पांतर्गत मोबाईल केबल टाकण्याचे काम तालुक्‍यात सुरू आहे. ही केबल रस्त्याच्या बाजूला साइडपट्ट्या सोडून टाकण्याची ठेकेदाराला अट आहे. त्यासाठी किती खोदकाम करावे, याचेही निकष ठरवून दिले आहेत. तथापि, बहुतेक ठेकेदारांनी सगळे नियम बासनात गुंडाळून ठेवले आहेत. शहरातून पारगाव सुद्रिककडे जाणाऱ्या रस्त्यावर, तसेच साइडपट्ट्या खोदून हे काम झाले आहे. याबाबत तक्रार केल्यावर बांधकाम विभागाने ठेकेदारांना लेखी नोटीस बजावून, केबल काढून घेताना रस्त्यांची डागडुजी करण्याचे फर्मान काढले. 

दरम्यान, पालिका हद्दीतून अशा काही केबल गेल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी पालिका प्रशासनाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समजले. पारगाव रस्त्यावर पालिकेने मोठा निधी खर्चून कामे हाती घेतली आहेत. मात्र, हा रस्ताही केबलमुळे उखडला गेला. तरीही पालिकेला जाग आलेली नाही. 
याबाबत मुख्याधिकारी मंगेश देवरे म्हणाले, की केबलसाठी खोदकामाबाबत तक्रार आली असून, ठेकेदाराला नोटीस देणार आहोत. पालिकेत कर्मचारी कमी असल्याने सगळीकडे लक्ष देता येत नाही. 

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश बोरुडे म्हणाले, एकीकडे रस्त्यांच्या कामांवर मोठा निधी खर्च होऊनही अपेक्षित दर्जा मिळत नाही. त्यात आता थेट केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला, तरीही पालिकेला माहिती होत नाही. याबाबत ठेकेदारासह हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी.

सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अरविंद अम्पलकर म्हणाले, साइडपट्ट्या खोदणाऱ्या संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करण्याबाबत स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excavation for online gram panchayat work in Shrigonda taluka