esakal | Ahmednagar : मोहटादेवी गडावर उत्साहात घटस्थापना
sakal

बोलून बातमी शोधा

 Mohatadevi

Ahmednagar : मोहटादेवी गडावर उत्साहात घटस्थापना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर आज (गुरुवारी) तुरळक भाविक व विश्वस्तांच्या उपस्थितीत देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर व आरती कुर्तडीकर यांच्या हस्ते उत्सवाच्या वातावरणात घटस्थापना करण्यात आली.

घटस्थापनेपूर्वी सकाळी मोहटे गावातून देवीचा सुवर्णालंकार असलेला मुखवटा मोटारीने गडावर आणला गेला व त्यानंतर घटस्थापना करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार आज सकाळी सात वाजता देवस्थान समितीने ऑनलाइन सेवा सुरू केली. नगरहून मोहटादेवी गडावर पायी आलेले भाविक बांधकाम विभागातील अभियंता राहुल शेळके व सेनादलातील निवृत्त जवान बबन शिंदे यांनी सर्वप्रथम या सुविधेचा लाभ घेतल्याने, मुख्य मंदिराचे दरवाजे त्यांच्याच हस्ते उघडण्यात आले.

हेही वाचा: 'पाहुणे गेल्यानंतर मी बोलीन', अजित पवारांचं सूचक वक्तव्य

या दोन्ही भाविकांचे देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर घटस्थापना सोहळा पार पडला. या सोहळ्याचे पौराहित्य नारायणदेवा सुलाखे, राजूदेवा मुळे व भूषण साखरे यांनी केले. या वेळी देवस्थानचे विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे, भीमराव पालवे, आजिनाथ आव्हाड, अशोक विक्रम दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे व तुरळक भाविक उपस्थित होते.

देवस्थानच्या वेबसाइटवर एकाच वेळी पाच भाविकांच्या नावाची नोंद करण्यात येत होती. मुख्य मंदिरात सुद्धा पास व मास्क असल्याशिवाय प्रवेश दिला जात नव्हता, तसेच मुख्य मंदिरात भाविकांना हार, फुले, खण, नारळ, ओटी नेता येत नव्हती. यंदा कोरोना नियमांच्या अटींमुळे दरवर्षीप्रमाणे होणारे गडावर ज्योत आणणे, घटी बसवणे, भजन, कीर्तन, कावड आणणे, कलावंताच्या हजेऱ्या, कुस्त्यांचा हंगामा, महाप्रसाद हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने दरवर्षी प्रमाणे भाविकांच्या गर्दीने गड फुलला नाही. देवीच्या गाभाऱ्यात पिंपरी-चिंचवड येथील भाविक राजेंद्र भोंडवे यांनी फुलांची आकर्षक सजावट केली होती. याशिवाय पाथर्डी शहरातील कालिका व चौंडेश्वरीदेवी, तिळवण तेली समाज मंदिर, रेणुकामाता मंदिर, गाडगे आमराई येथे, तसेच तालुक्यातील देवीचे धामणगाव, येळी, तिसगाव येथील मंदिरात उत्साहात घटस्थापना करण्यात आली.

loading image
go to top