सत्य लपविण्यासाठीच खोटे आरोप : कळमकर 

अमित आवारी
Sunday, 19 July 2020

कळमकर यांनी म्हटले आहे, की विरोधकांनी, या पथदिव्यांचे काम पूर्ण का झाले नाही, याचे उत्तर स्वत:च्याच नेत्याला मागावे. चुकीचे आरोप करण्याच्या नादात ते स्वत:च्याच नेत्याला अडचणीत आणत आहेत, याचे भानही त्यांना राहिले नाही.

नगर : तपोवन रस्त्याच्या कामात डल्ला मारण्याचा प्रयत्न शिवसेनेमुळे बारगळेल, अशी भीती विरोधकांना वाटत आहे. आरोप करणाऱ्यांनी स्वतःच्या नेत्याला विचारावे. मी महापौर असताना मंजूर झालेल्या, प्रोफेसर कॉलनी परिसरातील पथदिव्यांच्या कामांबाबत चुकीचे व दिशाभूल करणारे आरोप करण्यात येत आहेत. खाऊगिरीत माहिर असलेल्यांकडून तपोवनचे सत्य लपविण्यासाठी खोटेनाटे आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असे प्रत्युत्तर माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिले. 

अवश्‍य वाचा - तारकपूर, सूर्यनगर कंटेन्मेंट झोन 

प्रसिद्धिपत्रकात कळमकर यांनी म्हटले आहे, की विरोधकांनी, या पथदिव्यांचे काम पूर्ण का झाले नाही, याचे उत्तर स्वत:च्याच नेत्याला मागावे. चुकीचे आरोप करण्याच्या नादात ते स्वत:च्याच नेत्याला अडचणीत आणत आहेत, याचे भानही त्यांना राहिले नाही. 

महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी प्रोफेसर कॉलनी परिसरातील पथदिव्यांच्या कामात 50 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे बोट दाखविले होते. या आरोपाला कळमकर यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले आहे, की बारस्कर स्वत:च न बसविलेल्या पथदिव्यांच्या घोटाळ्यात अखंड बुडालेले आहेत. त्यांच्याच प्रभागातील अनेक पथदिवे कित्येक महिन्यांपासून बंद असतात, त्यांची "लोटके' प्रकरणामुळे उडालेली भंबेरी अजूनही जनता विसरलेली नाही. त्यांनी असे आरोप करणे सयुक्तिक नाही. 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव म्हणाले, की दुसऱ्यांची चांगली कामे डोळ्यात खुपणाऱ्यांचे, उपनगरांतील नसते उद्योग बाहेर काढता येतील. सावेडी कचरा डेपोला विरोध करून तो हलविण्याची भूमिका घेणाऱ्यांनी नंतर कोणता मलिदा मिळाल्याने कचरा डेपो स्थलांतराचा विषय सोडून दिला, याचेही उत्तर मिळणे अपेक्षित आहे. 

तत्कालीन महापौरांचा स्वीय सहायक बाबू चोरडिया ट्रॅपमध्ये अडकला तो कोणाच्या मोबाईलचे बिल भरण्यासाठी, याचे उत्तर मिळालेले नाही. उत्तर मिळाल्यावर बाकीचे विषय घेऊ. 
- संपत बारस्कर, विरोधी पक्षनेते, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: False allegations to hide the truth: Kalamkar