व्वा रे बळीराजा, बैलांचा केला हॅप्पी बर्थ डे! चर्चा तर होईलच ना

आनंद गायकवाड
Tuesday, 6 October 2020

संगमनेर तालुक्यातील रणखांब येथील सूर्यभान कोंडाजी शेजवळ या शेतकऱ्याने शेतीसाठी शक्ती व शिवा या नावाचे उमदे बैल जोपासले आहेत.

संगमनेर ः आपल्या मातीतल्या संस्कृतीत रुजलेली मनाच्या मोठेपणाची बीजे आजही कायम आहेत. कृषी संस्कृतीचा आदिम काळापासून मोठा आधार असलेली बैलांची जो़डी बदलत्या काळातही आपले अस्तित्व टिकवून आहे.

वर्षातून एकदा साजरा होणारा बैलपोळा हे त्यांच्या मानाचा, सन्मानाचा दिवस. आजही आपल्या शेतीचा आधार असलेल्या बैलांवर जीवापाड प्रेम कऱणाऱ्या एका शेतकऱ्याने बैलांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करुन त्यांच्याप्रती आपल्या संवेदना प्रकट केल्या.

संगमनेर तालुक्यातील रणखांब येथील सूर्यभान कोंडाजी शेजवळ या शेतकऱ्याने शेतीसाठी शक्ती व शिवा या नावाचे उमदे बैल जोपासले आहेत. शेतीच्या यांत्रिकीकरणाच्या काळात अद्याप ग्रामीण भागात बैलांवर आधारित शेती केली जाते.

शेती व्यवसायावर आपल्या कुटूंबाच्या प्रगतीत आपल्या लाडक्या बैलजोडीचा सिंहाचा वाटा असल्याच्या भावनेतून त्यांनी बैलांचा कुटुंबातील सदस्य समजून त्यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. त्यासाठी केकही आणला होता. या वेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. तसेच पोळा सणाप्रमाणे आपल्या बैलजोडीचा साज शृंगारही केला होता. वाद्यांच्या गजरात व पाहुणे रावळ्यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला. 

शेजवळ कुटूंबियांच्या या आगळ्या वेगळ्या पशुप्रेमाची माहिती समजताच समाजमाध्यमावर चर्चेला उधाण आलं. काही महाभाग आपल्या आई-वडिलांनाही मान देत नाहीत. त्यांचा सांभाळही करीत नाहीत. त्यांच्यासाठी बैलांचा वाढदिवस ही एक चपराक आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer celebrated the bull's birthday