तीन वर्षाची मुलगी पलंगावर मृतावस्थेत; शेतकऱ्याने केली आत्महत्या

विलास कुलकर्णी
Saturday, 31 October 2020

राहुरी तालुक्‍यातील दवणगाव येथे गुरुवारी मध्यरात्री शेतकऱ्याने घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यातील दवणगाव येथे गुरुवारी मध्यरात्री शेतकऱ्याने घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची तीन वर्षांची मुलगी पलंगावर मृतावस्थेत आढळली. मुलीच्या गळ्यावर लाल व्रण आहे. गळा दाबून तिचा खून करून वडिलांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. 

अनिल दिनकर पाळंदे (वय 47, रा. पाळंदे वस्ती, दवणगाव) व आदिरा अनिल पाळंदे (वय 3), अशी मृतांची नावे आहेत. मुलीचा मृतदेह नगर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविला आहे. मृत अनिल यांची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी आंबी स्टोअर येथे गेली आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांना मुलगी झाली. घरात अनिल व त्यांची तीन वर्षांची मुलगी एका खोलीत झोपले होते. दुसऱ्या खोलीत अनिल यांचे आई-वडील झोपले होते. शुक्रवारी सकाळी सहा वाजता अनिल यांनी खोलीचा दरवाजा न उघडल्याने आई-वडिलांनी शेजाऱ्यांना बोलाविले. त्या वेळी खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत अनिल यांचा, तर पलंगावर मुलगी आदिराचा मृतदेह आढळला. 

पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक निरीक्षक सचिन बागूल यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृताचे दोन भाऊ नाशिक येथे राहतात. त्यांना तातडीने बोलाविण्यात आले. 

मृत आदिराच्या गळ्याजवळ लाल व्रण आहे. त्यामुळे तिचा गळा दाबून खून करून, नंतर अनिल यांनी गळफास घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. अनिल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरीत पाठविला होता. राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

अतिवृष्टीमुळे चुलते अनिल यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. लोकांचे हातउसने पैसे होते. ते कर्जबाजारी झाले होते. त्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी. त्यांचा मुलीवर खूप जीव होता. त्यामुळे त्यांनी मुलीचा गळा दाबून खून केला असावा, यावर विश्वास बसत नाही. 
- संदीप पाळंदे, मृत अनिल यांचे पुतणे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers commit suicide in Davangaon in Rahuri taluka