esakal | कांद्याने घातले मातीत तरी लागवडीसाठी शेतकऱ्यांची झुंबड
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers flock to onion cultivation in Shrirampur

तालुक्यातील अनेक शिवारात यंदा महागडी कांदा बियाणे खरेदी करून कांदा रोपे तयार केली. पुढील वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्याच्या आशेपोटी शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहे.

कांद्याने घातले मातीत तरी लागवडीसाठी शेतकऱ्यांची झुंबड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः तालुक्यात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची पातळी अद्याप टिकुन आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत. मात्र, वारंवार पडणारा पाऊस आणि ढगाळ हवामामुळे शेतकऱ्यांचा पेरा वाया गेला. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. तरीही कांद्याचा पिच्छा सोडायला तयार नाहीत.

मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील गोदावरी आणि प्रवरानदी पट्यात उन्हाळी कांदालागवडीची लगबग सुरु आहे.

तालुक्यात मागील वर्षी आठ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदालागवड झाली होती. यंदा दहा हजार हेक्टर क्षेत्रावर कांदालागवड होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांनी सांगितले.

हेही वाचा - साई दर्शनासाठी केवळ बारा हजार भाविकांची व्यवस्था

तालुक्यातील अनेक शिवारात यंदा महागडी कांदा बियाणे खरेदी करून कांदा रोपे तयार केली. पुढील वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्याच्या आशेपोटी शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहे. त्यामुळे प्रारंभी ट्रॅक्टरद्वारे थेट कांदा बियाणे पेरणी केली. आणि आता रोपवाटीका निर्मिती करुन कांदा लागवड सुरु आहे.

अशा दुहेरी कांदा लागवड पद्धतीमुळे तालुक्यात यंदा दोन हजार हेक्टरने कांदा लागवडीत वाढ होणार आहे. तालुक्यात यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती आहे. खरीपात अवकाळीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी आता कांदा लागवडीवर भर दिला आहे.

तालुक्यात मागील वर्षी आठ हजार हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवड झाली होती. यंदा ती कांदा लागवड आणखी दोन हजार हेक्टरवर वाढणार असून दहा हजार हेक्टर उन्हाळी कांदा लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

सततच्या हवामानातील बदलामुळे कांदा रोपेही खराब होण्याची भीती शिवारातून व्यक्त केली जात आहे. महागडी बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी कांदा रोपे तयार केली. रोपांच्या उपलब्धतेनुसार लागवडी टप्प्याटप्प्याने सुरु आहे.

नदी परिसरातील उसाच्या पट्यात कांदा लागवडी क्षेत्र वाढले आहे. एकीकडे सातत्याने कांद्याचे दर कमी होत असले तरी चांगले पाणी असल्याने कांदा लागवडीवरील भर मात्र कायम आहे.

तालुक्यात 50 हजार हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामासाठी असून कांदा, गहू, हरभरा, ऊस, मका, भाजीपाला आशा विविध पिकासह फळबागा घेतल्या जातात. यंदा प्रथमच चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळले. परिणामी, कांदा लागवड वाढणार असून गोदावरी आणि प्रवरानदी पट्यात सद्या कांदा लागवड सुरु झाल्याने अनेक मजुरांना काम मिळाले आहे. अहमदनगर
संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top