
संबंधित विभाग व प्रशासनाने वस्तूनिष्ठ पंचनामेही केले. शासनाने या संकटातील शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.
संगमनेर ः ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यामुळे सर्व हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांना दिलासा देत, तातडीने नुकसानीची पाहणी व पंचनामे करूनही अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील व्यापार, उद्योगावर परिणाम झाला. शेतमालाची विक्री करता न आल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली. अशा अवस्थेत कोरोनाशी झुंज देत, शेतकऱ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत, अपार कष्ट घेत पिके उभारली. मात्र, त्यावरही निसर्गाची अवकृपा झाली.
हेही वाचा - कांद्याने घातले मातीत तरीही शेतकरी सोडेने कांद्याचा पिच्छा
अतिवृष्टीमुळे शेतातील कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्षे, डाळिंबासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अकस्मात संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कृषी व महसूल विभागासह संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी, तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
संबंधित विभाग व प्रशासनाने वस्तूनिष्ठ पंचनामेही केले. शासनाने या संकटातील शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. मात्र, दिवाळी होऊन महिना झाला, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा एक रुपयाही पदरात न पडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.