लॉकडाऊनमध्ये ‘या’ व्यवसायातून तरुणाने मिळवले दोन लाखाचे उत्पन्न

सुनील गर्जे
Friday, 17 July 2020

निसर्गाची अवकृपा, मशागत, खतांचे वाढते भाव, शेती मालाला बाजार भाव मिळत नाही, असे अनेक कारणे सांगत शेती परवडत नाही, अशी ओरड काही जणांकडून होत असते. मात्र खडके फाटा (ता. नेवासे) येथील शरद भांगे या प्रयोगशील युवा शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरत मेहनतीच्या बळावर एक एकर शेतीतून लॉकडाऊनच्या अवघ्या दोन महिन्याच्या काळात भाजीपाला रोप विक्रीतून तब्बल दोन लाखाचे उत्पन्न घेतले आहे.

नेवासे (अहमदनगर) : निसर्गाची अवकृपा, मशागत, खतांचे वाढते भाव, शेती मालाला बाजार भाव मिळत नाही, असे अनेक कारणे सांगत शेती परवडत नाही, अशी ओरड काही जणांकडून होत असते. मात्र खडके फाटा (ता. नेवासे) येथील शरद भांगे या प्रयोगशील युवा शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरत मेहनतीच्या बळावर एक एकर शेतीतून लॉकडाऊनच्या अवघ्या दोन महिन्याच्या काळात भाजीपाला रोप विक्रीतून तब्बल दोन लाखाचे उत्पन्न घेतले आहे.
कोरोना संसर्गांच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. दरम्यान लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्राबरोबर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील खडके फाटा येथील युवा शेतकरी शरद भांगे यांनी कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विभागाकडून पाच लाखाचे अनुदान आणि स्वत: चे दहा लाखाचे भागभांडवल असे १५ लाखाचे एक एकरात तीस हजार स्क्वेअर फूट परिसरात उभारलेल्या शेडनेट व पॉलिहाऊसमध्ये भाजीपालाचे बीजारोपण केले.  त्यांनी एप्रिल ते जून दरम्यान वांगे, शिमला मिरची, साधी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला रोपे या ठिकाणी घेतली. आतापर्यंत पाच लाख रोपाची विक्रीतुन सहा लाख रुपये उत्पादन झाले असून, यापैकी लागवड व अन्य खर्च वजा जाता दोन लाख रुपयांचे उत्पन्न भांगे यांनी लॉकडाऊन काळात मिळाले आहे.

केळी-ऊस रोपात लाखाचा नफा 
भाजीपाला प्रमाणेच शेतकरी केळीचीही लागवड मोठ्या प्रमाणात करत असल्याने शरद भांगे यांनी वर्षभरात ४० हजार  ट्युशु कल्चर  केळी रोपे तयार केली. ती विक्रीतून पाच लाख ६० हजार रुपये  मिळाली. त्यातून ८० हजार रुपयांचे तर उसाचे सुधारित वाणाची ४० हजार रोपे विक्रीतून एक लाख रुपये मिळाले.  त्यातून ३६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे लागवड व इतर खर्च जात एक लाख १६ हजार रुपयांचेउत्पन्न केळी व ऊस रोप विक्रीतून वर्षभरात घेतले आहे. 

शरद भांगे म्हणाले, शेतीही नफ्याचीच असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करावा.  मी शेडनेट व पॉलिहाऊसमध्ये भाजीपाला, केळी व ऊसाची रोपे तयार करतो.  लॉकडाऊन काळात भाजीपाला रोप विक्रीतून दोन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न घेतले आहे.

तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय डमाळे म्हणाले, शेतीतून फारसे उत्पन्न घेता येत नाही, अशी मानसिकता बनविलेल्या शेतकरी बांधवांसाठी शरद भांगे या युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीतजास्त उत्पन्न घ्यावे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Nevase taluka earned 2 Rs lakh in lockdown