
शेतांमधून विविध साहित्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात अनेकदा करूनही, चोरट्यांविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
श्रीरामपूर ः वीजपंपांसह तुषार संचांच्या चोरीचे प्रमाण वाढल्याने तालुक्यातील गोंधवणी परिसरासह अनेक भागांतील शेतकरी त्रस्त आहेत. गोंधवणी ग्रामस्थांसह परिसरातील शेतकऱ्यांनी काल (शुक्रवारी) शहर पोलिस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
शेतांमधून विविध साहित्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात अनेकदा करूनही, चोरट्यांविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
चोरट्यांनी काल रात्री बाराच्या सुमारास परिसरातील प्रवीण फरगडे यांच्या विहिरीतील वीजपंप चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीत टाकलेला वायररोप फरगडे यांच्या सतर्कतेमुळे तसाच सोडून चोरटे पसार झाले. यापूर्वी विहिरीमधील वीजपंप चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
पोलिसांनी शोध घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी गोंधवणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे. चोऱ्या न थांबल्यास शेतकरी गोठ्यातील जनावरे पोलिस ठाण्यासमोर आणून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा प्रवीण फरगडे, दत्तात्रय कांदे, प्रमोद फरगडे, नितीन फरगडे, विजय मोरगे, गोविंद कांदे, संदीप वहाडणे, विष्णू मोढे यांनी दिला आहे.
दरम्यान, शेतातील साहित्याच्या चोरीच्या घटना रोखण्याच्या मागणीची निवेदने गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांना पाठविण्यात आली आहेत.