शेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतातच; कांदा, ऊसलागवडीची लगबग

विनायक दरंदले
Saturday, 14 November 2020

कपाशी, सोयाबीन, बाजरी व तुटून गेलेल्या उसामुळे रान मोकळे झाल्यानंतर आता मुबलक पाणी आणि मुळा धरणाची स्थिती लक्षात घेऊन सर्वत्र दिवाळीतही कांदा आणि ऊसलागवडीची लगबग पाहायला मिळत आहे.

सोनई (अहमदनगर) : कपाशी, सोयाबीन, बाजरी व तुटून गेलेल्या उसामुळे रान मोकळे झाल्यानंतर आता मुबलक पाणी आणि मुळा धरणाची स्थिती लक्षात घेऊन सर्वत्र दिवाळीतही कांदा आणि ऊसलागवडीची लगबग पाहायला मिळत आहे. कांदा बियाणे व रोप मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आटापिटा करावा लागतो. 

या वर्षी झालेल्या मुबलक पावसाने व नंतर झालेल्या परतीच्या पावसाने कांदारोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिवाळी सण असतानाही वाफसा आलेल्या शेतात शेतकऱ्यांनी नांगरट, रोटा मारणे, सरी पाडून रानबांधणी करण्यास सुरवात केली आहे. कांदा बियाण्याचा भाव दुपटीने वधारला आहे. रोप कमी प्रमाणात असल्याने चढ्या भावाने रोपे घेतली जात आहेत. उपलब्ध भागातून रोप आणले तर मजूर मिळेनात. अशा दुहेरी संकटाचा सामना सध्या सुरू आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुबलक पावसाने प्रथमच सोनई, घोडेगाव, चांदे, करजगाव भागातील विहिरी तुडुंब भरल्या आहेत. कूपनलिकाही भरभरून वाहत आहेत. जून महिन्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांनी पाणी देण्यासाठी वीजपंपाचे बटण दाबलेले नाही.

कांद्याला सध्या सुगीचे दिवस समजून शेतकरी मोलामहागाचे बी व रोपे घेऊन लागवड करीत आहेत. आजही नदी व ओढे वाहते आहेत. विहिरी तुडुंब आहेत. पाण्याची चिंता नसली, तरी उसाचे महागडे बेणे, कांदारोपे व मजुरांची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers start work in Diwali in Nagar district