esakal | आता शेतकऱ्यांच्या पशुधनामागे रोगांचे झेंगाट, ५० जनावरे दगावली

बोलून बातमी शोधा

जनावरे
आता शेतकऱ्याच्या पशुधनामागे रोगांचे झेंगाट, ५० जनावरे दगावली
sakal_logo
By
प्रा. सुनील गर्जे

नेवासे : शेतकऱ्यांच्या शेतमालाला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. आता त्यांच्यामागे वेगळेच झेंगाट लागले आहे. रोगराईने शेतकरी आणि जनावरे बाधित झाले आहेत.

तालुक्‍यातील पाच गावांत आठ दिवसांपासून लाळ्या-खुरकूत व घटसर्पाच्या साथीने पन्नासपेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या विभागीय रोगअन्वेषण प्रयोगशाळेनेही त्या जनावरांचे मृत्यू लाळ्या-खुरकूत व घटसर्पाने झाल्याचे स्पष्ट केले. दीडशेपेक्षा अधिक जनावरे बाधित झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण व अन्य उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, जनावरांचा मृत्यू होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नेवासे तालुक्‍यातील जेऊर हैबती, कुकाणे, नांदूर शिकारी, भेंडे (खुर्द व बुद्रुक), देवगाव आदी गावांत आठ दिवसांपासून जनावरांचा मृत्यू होऊ लागला आहे. त्यात बहुतांश जनावरे संकरित आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त डॉ. आदिनाथ थोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांच्या पथकाने तातडीने पाहणी करून, 22 एप्रिलला नाशिकच्या विभागीय रोगअन्वेषण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी नमुने पाठविले होते. त्याचे अहवाल बुधवारी आले. त्यात लाळ्या-खुरकूत, घटसर्पाने संबंधित जनावरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

बुधवारी नाशिकच्या विभागीय रोगअन्वेषण प्रयोगशाळेतील तज्ज्ञांच्या पथकाने या भागात पाहणी केली. या भागात अजूनही दीडशेपेक्षा अधिक जनावरे बाधित असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत पन्नासपेक्षा अधिक जनावरे मृत झाले असून, त्यांचे शवविच्छेदन केले आहे. त्यात पन्नास टक्के जनावरांचा घटसर्पाने मृत्यू झाल्याचे दिसून आले. दरम्यान, जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर लगेच लाळ्या-खुरकूत व घटसर्पाचे लसीकरण सुरू केले आहे.

आतापर्यंत 2180 जनावरांना लसीकरण केले आहे. मात्र, अचानक जनावरांचा मृत्यू होऊ लागल्याने शेतकरी, पशुपालक हवालदिल झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी तालुक्‍यातील तेलकुडगाव येथेही अशाच प्रकारची साथ उद्‌भवली होती. त्यात काही जनावरांचा मृत्यू झाला होता.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

गोठ्यात व परिसरात चुन्याची फक्की टाकावी, आजारी जनावरांना वेगळे बांधावे, आजारी जनावरांची बाजारात ने-आण बंद करावी, आजारी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजू नये, जनावरांचा गोठा 4 टक्के धुण्याच्या सोड्याच्या द्रावणाने धुऊन घ्यावा, रोगाची साथ आलेल्या गावाच्या नजीकच्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे.

"नेवाशातील साधारण पाच-सहा गावांत लाळ्या-खुरकूत, घटसर्पाची लागण झालेल्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. काही जनावरे बाधित आहेत. शक्‍यता वाटत असलेल्या गावांत लसीकरण सुरू केले असून, उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

- डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद