आश्वी नेमकी कोणाची, थोरातांची कि विखे पाटलांची

आनंद गायकवाड
Thursday, 14 January 2021

तालुक्‍यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या आश्वी गटात थोरात व विखे हे पारंपरिक विरोधक असल्याने, निवडणुकीची खरी रंगत सुरू आहे. 

संगमनेर ः तालुक्‍यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आल्याने, प्रचाराचा धुरळा उडाला होता. प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देत उमेदवारांची मतदारांना गळ घालण्याची धडपड सुरू आहे.

तालुक्‍यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या आश्वी गटात थोरात व विखे हे पारंपरिक विरोधक असल्याने, निवडणुकीची खरी रंगत सुरू आहे. 

संगमनेर तालुक्‍यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व आहे, तर शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या कनोली, पिंप्री- लौकी- अजमपूर, चिंचपूर खुर्द, चणेगाव, झरेकाठी, पानोडी, प्रतापपूर, शेडगाव, ओझर बुद्रुक, औरंगपूर, खळी, दाढ खुर्द, मनोली व शिबलापूर या गावांमधील निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंग चढला आहे.

यांपैकी 11 गावांमधील निवडणुकीत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात विरुद्ध भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये सरळ लढत आहे. स्थानिक पातळीवरील अस्तित्व टिकवताना, नेत्याच्या नजरेत भरण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. प्रतापपूर गावात मात्र विखे पाटीलप्रणीत तीन पॅनलमध्येच लढत होत आहे. 

पानोडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 11 जागांसाठी दोन अपक्षांसह 24 उमेदवार रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीवर 50 वर्षांपासून असलेले थोरात गटाचे वर्चस्व संपून गेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन ग्रामपंचायत विखे गटाच्या ताब्यात गेली.

हेही वाचा - अधिकाऱ्यांनी नाद केला अंगलट आला

ती परत मिळविण्यासाठी थोरात गटाची धडपड सुरू आहे, तर सत्ता कायम राखण्यासाठी विखे गट सरसावला आहे. शिबलापूर ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 22 उमेदवार उभे असून, सध्या विखे गटाकडे असलेली सत्ता मिळविण्यासाठी थोरात गटाचे कार्यकर्ते सक्रिय झाल्याने वातावरण तापले आहे.

अडीच हजार लोकसंख्येच्या चणेगाव ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांतील नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, दोन अपक्षांसह 20 उमेदवार रिंगणात आहेत. थोरात गटाचे नेतृत्व बालकिसन आसावा, तर विखे पाटील गटाचे नेतृत्व मच्छिंद्र पावडे करीत आहेत.

मागील निवडणुकीत थोरात गटाचे पाच, तर विखे गटाचे चार सदस्य निवडून आले होते. आरक्षणामुळे सरपंचपद विखे गटाकडे होते. आजवर केलेल्या विकासकामांच्या जोरावर सत्ता मिळविण्याचा विश्वास थोरात गटाला आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight in Ashwi group, Thorat-Vikhe Patil group