"तोडपाणी" केल्याने कालवा निरीक्षकावर गुन्हा दाखल

गौरव साळुंके
Tuesday, 8 December 2020

सोनवणे येथील वडाळा उपविभाग पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

श्रीरामपूर ः पत्नीच्या नावावरील शेतजमीनीत अनुदानित विहीर खोदण्यासाठी लाभ क्षेत्राखाली जमीन नसल्याचा दाखला देण्यासाठी लाचेची मागणी केलेल्या कालवा निरीक्षकाला पोलिसांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले.

येथील नाॅर्दन ब्रॅन्च परिसरात लाच प्रतिबंध विभागाच्या पोलिस पथकाने आज सांयकाळी ही कारवाई केली. या प्रकरणी कालवा निरीक्षक विनोद सोनवणे (वय ३०, अंजली अपार्टमेंट, मोरगेवस्ती) यांच्याविरुद्ध साडेतीन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनवणे येथील वडाळा उपविभाग पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

चार हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीनंतर अखेर साडेतीन हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार येथील संगमनेर रस्त्यावरील वडाळा उपविभाग पाटबंधारे कार्यालयात लाच घेताना पोलिसांनी सोनवणे यांना रंगेहाथ पकडले.

लाच प्रतिबंध विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपाधिक्षक हरीष खेडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस निरीक्षक दीपक करांडे यांनी सापळा रचुन कारवाई केली.

या बाबत खानापूर येथील एका व्यक्तीने तक्रार दिल्याचे समजते. याप्रकरणी पोलिस निरीक्षक दीपक करांडे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात सांयकाळी उशिरा विनोद सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against a canal inspector in Shrirampur