भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरूद्ध अपहाराचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 December 2020

नगर अर्बन बॅंकेच्या माजी संचालकांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. तसेच संचालकांनी म्हणणे मांडले.

नगर ः नगर अर्बन बॅंकेतील तीन कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माजी संचालक राजेंद्र गांधी व पोपट लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली बॅंकेच्या सभासदांनी प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे प्रशासक मिश्रा यांनी बॅंकेच्या मुख्य शाखेचे शाखाधिकारी मारूती औटी यांना फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळ, शाखाधिकारी व कर्जदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

मारुती औटी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 7 ऑक्‍टोबर 2017 ते 10 डिसेंबर 2020 या दरम्यान बॅंकेचे माजी अध्यक्ष दिलीप मनसुखलाल गांधी (रा. आनंदऋषी मार्ग, नगर), मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्‍याम अच्युत बल्लाळ (रा. अर्बन बॅंक कॉलनी, सावेडी, नगर), कर्जदार टेरासॉफ्ट टेक्‍नॉलॉजीचे आशुतोष सतीश लांडगे (रा. वेदांतनगर, सावेडी, नगर) व संचालक मंडळ सदस्य यांनी कट रचून, संगनमताने बॅंकेस खोटे कागदपत्र तयार करुन बॅंकेच्या तीन कोटीच्या रकमेचा अपहार केला. यात ठेवीदार, सभासद यांचा विश्‍वासघात केला आहे. तीन कोटीची रक्कम आर. बी. कासार, देवी एजन्सी व गिरीलाल एंटरप्राइजेस यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेत बॅंकेची फसवणूक केली आहे. 

हेही वाचा - भाजपला जबर हादरा, दोन मातब्बर नेते गेले काँग्रेसमध्ये

संबंधितांनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करून अवास्तव कर्ज मंजूर केलेले आहे. त्याद्वारे बॅंकेच्या रकमेची चोरी, अफरातफर व फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोजन महाजन करीत आहेत. 

संचालक म्हणतात, आमचा संबंध नाही 
नगर अर्बन बॅंकेच्या माजी संचालकांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. तसेच संचालकांनी म्हणणे मांडले. यावेळी माजी उपाध्यक्ष अशोक कटारिया, माजी अध्यक्ष राधावल्लभ कासट, विजय मंडलेचा, राजेंद्र अग्रवाल आदी संचाकल उपस्थित होते. संचालक मंडळाचा बॅंकेच्या दैनंदिन व्यवहारात कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे बॅंक ते शाखा झालेल्या पैशाच्या हस्तांतरात बॅंक संचालकांचा संबंध नाही, असे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. अहमदनगर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case of embezzlement against former BJP MP Dilip Gandhi