Ahmednagar : व्यापाऱ्यांना दंड; हा काेणता न्याय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापाऱ्यांना दंड; हा काेणता न्याय?

व्यापाऱ्यांना दंड; हा काेणता न्याय?

अहमदनगर : मास्क न लावता ग्राहक दुकानात आल्यास दुकानदाराला दहा हजार रुपयांचा दंड हा कोणता न्याय? प्रत्येक गिऱ्हाईक वस्तू घेतेच असे नाही. बऱ्याचदा चौकशी करून परत जाते. ज्यांचा गुन्हा, त्यांनाच शिक्षा हवी, असे मत नगर शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. याबाबत व्यापाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

कोरोनामुळे अनेक व्यापारी हवालदिल झाले होते. छोटे व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आहेत. सध्या व्यावसायिक गाडी रुळावर आली आहे. त्यामध्ये अशा नियमावली केल्या, तर दुकानदारांनी काय करायचे, हेच कळेना. अनेकदा व्यापाऱ्यांना प्रत्येक संकटाला तोंड द्यावे लागते. धंदा कमी आणि खर्च जास्त, अशी परिस्थिती व्यापारी वर्गाची झाली आहे. जागेचे भाडे, बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात नाहीत. घेतलेल्या कर्जाचे व्याज वेळेवर जात नाही, कर्मचाऱ्यांचा पगार निघत नाही, वीजबिल भरायला पैसे नसतात, अशा बऱ्याच अडचणी आहेत. हे कोणी समजून घेईल का, असा सवाल नगरमधील व्यापाऱ्यांनी केला आहे.

शासनाने केलेल्या चुकीच्या नियमावली मान्य नाहीत. ताबडतोब नियमावली बदलून, ज्यांनी मास्क घातला नाही, त्या व्यक्तीस दंड करावा. व्यापाऱ्यांना करू नये, अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. या वेळी संजय चोपडा, शैलेश मुनोत, अजित जगताप, गोरख पडोळे, राजू तिवारी, धीरज मुनोत, किशोर तलरेजा, सचिन चोपडा, सागर कायगावकर, श्यामराव देडगावकर तसेच शहरातील व्यापारी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देऊ

व्यापाऱ्यांवर लादलेली शासनाची नियमावली व या आदेशाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. व्यापारी कोरोनासंदर्भात ग्राहकांमध्ये जनजागृती करीत आहेत. कोविड नियमांचेदेखील व्यापारी पालन करीत आहेत, तसेच लसीकरणाबाबतदेखील जनजागृती त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अन्याय होता कामा नये. त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देणार आहोत, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

Web Title: Fines To Traders Why This Justice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top